सॅम पित्रोदांचे वक्तव्य असमर्थनीय, बेजबाबदारपणाचे: राहुल गांधी 

वृत्तसंस्था
शनिवार, 11 मे 2019

सॅम पित्रोदा यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे होते, त्यांनी माफी मागितली पाहिजे. 1984 च्या दंगलीमुळे यापूर्वीच खूप वेदना झेललेल्या आहेत. या दंगलीला जबाबदार असलेल्यांना शिक्षा झाली असून, न्याय झालेला आहे. माझी आई सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी यापूर्वीच माफी मागितलेली आहे.

नवी दिल्ली : शीख दंगलीबाबत सॅम पित्रोदा यांनी केलेले वक्तव्य असमर्थनीय असून, त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

शीख दंगलीबाबत 'हुआ तो हुआ' या वादग्रस्त विधानानंतर भाजपने सोडलेले टीकास्त्र आणि कॉंग्रेसने दिलेल्या तंबीमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोडा यांनी शुक्रवारी सायंकाळी माफीनामा सादर केला. जुने विसरून पुढे जाऊया, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. पण, त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. पण, मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे. पित्रोडा यांच्या विधानानंतर राजकीय नेत्यांनी टीकास्त्र सोडले आणि खुद्द काँग्रेसनेही या विधानापासून दूर राहणे पसंत करीत भाषेबद्दल सर्व नेत्यांना तंबी दिली. त्यानंतर हा माफीनामा आला. पित्रोदा यांच्या विधानामुळे काँग्रेसची पंचाईत झाली असून, लोकसभेच्या रणधुमाळीत भाजपच्या हाती कोलीत मिळाले आहे. 

याविषयी राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्ट टाकत म्हटले आहे, की सॅम पित्रोदा यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे होते, त्यांनी माफी मागितली पाहिजे. 1984 च्या दंगलीमुळे यापूर्वीच खूप वेदना झेललेल्या आहेत. या दंगलीला जबाबदार असलेल्यांना शिक्षा झाली असून, न्याय झालेला आहे. माझी आई सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी यापूर्वीच माफी मागितलेली आहे. माझीही या बाबतीत भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे सॅम पित्रोदा यांनी केलेले वक्तव्य समर्थनीय नाही. मी त्यांच्या बोललो असून, त्यांनी माफी मागावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1984 was a needless tragedy Sam Pitroda must apologise says Rahul Gandhi