Ayodhya News : महाराष्ट्रासह 20 राज्यांना हवी आहे अयोध्येत 'भवना'साठी जागा!

जागतिक दर्जाचे श्रीराम मंदिर होणार असल्यामुळे अयोध्येत भवन उभारण्यासाठी महाराष्ट्रासह सुमारे 20 राज्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे जागा मागितली आहे.
MP Lallusingh Ayodhya
MP Lallusingh Ayodhyasakal

अयोध्या - जागतिक दर्जाचे श्रीराम मंदिर होणार असल्यामुळे अयोध्येत भवन उभारण्यासाठी महाराष्ट्रासह सुमारे 20 राज्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे जागा मागितली आहे. तसेच 145 हॉटेल्स बांधण्याचे प्रस्ताव अयोध्या विकास निगमकडे आले आहेत. तसेच या सोहळ्याचे निमित्त साधून केंद्र आणि राज्य सरकारने अयोध्या परिसरातील विकासाची गंगा वाहती केली आहे.

अयोध्येत 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा जागतिक दर्जाचा असल्यामुळे अयोध्यातील विकास कामांना मोठा वेग आला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अयोध्येत सध्या तीस हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. 2 रिंग रोड, परिक्रमा मार्गाचे (84 कोस) चौपदरीकरण, महामार्ग आणि सेवा रस्ते, रेल्वे, विमानतळ, 4 उड्डाणपूल आदींचा त्यात समावेश आहे. अयोध्या - काशी, लखनौ - गोरखपुर, अयोध्या - रायबरेली मार्गांचे चौपदरीकरण सुरू झाले आहे.

विकास कामांची पाहणी करून आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरुवारी अयोध्या दौऱ्यावर होते. तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे देखील गेल्या तीन दिवसांपासून अयोध्येत तळ ठोकून असून विकास कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत आहेत.

विविध राज्यांना भवन उभारण्यासाठी अयोध्या विकास निगम आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जागा निश्चित करण्यात येत आहेत. तसेच लहान - मोठ्या हॉटेलच्या प्रस्तावांवर प्रक्रिया सुरू झाली असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

प्रमुख विकास कामे

- अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळावरून 30 डिसेंबरला दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी दिल्लीकडे पहिले विमान झेप घेईल. मुंबई आणि आमदाबाद या मार्गावरही विमानसेवा लगेचच सुरू होणार आहे.

- अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव आता अयोध्या धाम रेल्वे जंक्शन असेल. या स्थानकाचेरी लॉन्चिंग करण्यात आले असून अयोध्या - दिल्ली मार्गावर वंदे भारत ही रेल्वे धावणार

- अयोध्या - गुप्तारघाट दरम्यान वॉटर मेट्रो चालणार

- श्रीराम वनात जाणाऱ्या अयोध्या ते चित्रकूट दरम्यानचा 266 किलोमीटरचा रस्ता चौपदरी करण्याच्या कामास प्रारंभ

- राम जन्मभूमी कडे जाणारा राम पथावर रामचरित्रातील कथा म्यूरल्समार्फत भाविकांपर्यंत पोहोचविण्याच्या कामाला वेग

- रामपथ या 14 किलोमीटरच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा घरे आणि दुकानांचे सारख्या पद्धतीचे लेआउट आणि रंगरंगोटी करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

- राजा दशरथ यांची समाधी (बिलबहरी घाट) ते अयोध्या या 21 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरण कामाला प्रारंभ

'अयोध्या हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीपासून स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने पावलं टाकली आहेत. त्यांची आता पूर्तता होत आहे. केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी अयोध्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, परिक्रमा मार्ग, रिंगरोड, उड्डाणपूल यासाठी सढळ हाताने मदत केली आहे. त्यामुळे दळणवळण सुलभ होत आहे. अयोध्या आता रेल्वे, रस्ता आणि विमान मार्गाने जगाशी जोडली जात आहे याचा आनंद आहे. श्रीराम मंदिरामुळे अयोध्या परिसरात उद्योग - व्यवसायाचे जाळे वाढत असून त्यामुळे उत्तर प्रदेशातील हजारो युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असून राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही आता त्यामुळे गती येणार आहे.'

- लल्लूसिंग, खासदार, अयोध्या

प्रतिष्ठापनेचा सात दिवस सोहळा

- श्री राम मूर्तीच्या प्रतिष्ठापानेनिमित्त अयोध्येत 16 ते 22 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम

- राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन अयोध्येत 27 ठिकाणी पार्किंग लॉट्स तयार करण्यात आले आहेत

- सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर येणार हे लक्षात घेऊन 3 हेलिपॅड उभारण्यात आले आहेत

- राम मंदिरापासून 84 किलोमीटर परिसरात मद्यविक्रीला राज्य सरकारकडून बंदी

प्रभू श्रीरामासाठी ...

- प्रसादासाठी छत्तीसगडमधून 3 हजार क्विंटल तांदूळ अयोध्येत येणार

- श्रीरामाची सासुरवाडी जनकपुर मधून 1100 प्रकारच्या भेटी येणार

- नेपाळमधून सोन्या-चांदीच्या आभूषणांसह 51 प्रकारची मिठाई येणार

- प्राणप्रतिष्ठपणेच्या मुख्य कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना गीता प्रेसकडून 'अयोध्या दर्शन' या पुस्तकाची प्रत भेट दिली जाणार

- सोहळ्या दरम्यानच्या आठवड्यात श्रीराम जन्मभूमी व्यासातर्फे 40 ठिकाणी अन्नछत्र चालवले जाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com