पोलिसांनी विष्ठा खायला लावली- 'निर्दोष' फजिलीचा आरोप

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

फजिली म्हणाला, "पोलिस विष्ठा तोंडात कोंबायचे आणि त्यानंतर चपाती व पाण्याबरोबर ती खायला लावायचे. अजूनही तो प्रकार आठवला की अंगावर काटा येतो." 

श्रीनगर : राजधानी दिल्लीमध्ये 2005 मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी मोहंमद हुसेन फजिली याची मागील आठवड्यात दिल्ली न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर तो 12 वर्षांनी घरी परतला असून, त्याने दिल्ली पोलिसांनी दिलेल्या अमानूष वागणूक दिल्याचे आरोप केले आहेत. 

स्फोटांनंतर पोलिसांच्या विशेष पथकाने संशयावरून फजिली याला श्रीनगरमधून ताब्यात घेतल्यानंतर तुरुंगातील पहिल्या 50 दिवसांच्या पोलिस कोठडीदरम्यान गुन्हा कबूल करविण्यासाठी पोलिसांनी हरेक प्रकारचा मानसिक व शारीरिक छळ केला.  
फजिली म्हणाला, "पोलिस विष्ठा तोंडात कोंबायचे आणि त्यानंतर चपाती व पाण्याबरोबर ती खायला लावायचे. अजूनही तो प्रकार आठवला की अंगावर काटा येतो." 

फजिली याच्यासह मोहंमद रफिक शहा याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 
दिल्लीतील पहाडगंज, सरोजिनीनगर आणि गोविंदपुरी या भागांमध्ये 29 ऑक्टोबर 2005 रोजी भीषण बाँबस्फोट झाले होते. या स्फोटात 62 जणांचा मृत्यू झाला होता, तर 200 जखमी झाले होते.या प्रकरणात दिल्ली पोलिसांचा संशय लष्करे तैयबावर होता. पोलिसांनी संशयावरून काश्मिरी युवक तारिक अहमद दार याला अटक केली होती.

फजिली हा त्यावेळी श्रीनगरमध्ये शाल विणण्याचे काम करत होता. त्याने सांगितले की, "अटक करून पोलिसांनी आम्हाला दिल्लीतील लोधी कॉलनी पोलिस चौकीत नेले. न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांनी आमचा खूप शारीरिक, मानसिक छळ केला. मला बाकावर झोपायला सांगून माझे हात बाकाखाली बांधले. त्यानंतर दोन पोलिस माझ्या पायांवर उभे राहिले आणि एकजण माझ्या पोटावरून चालत होता. दुसऱ्या पोलिसाने डिटर्जंट पावडर मिसळलेले पाणी प्यायला लावले."

या प्रकाराबद्दल कोणतीही तक्रार करायची नाही, अशी धमकी पोलिसांनी आम्हाला त्या संध्याकाळी न्यायाधीशांसमोर हजर करण्यापूर्वी दिली. 'न्यायाधीशांसमोर तोंड उघडले तर यापेक्षा वाईट होईल,' असे पोलिसांनी धमकावले, असे फजिली याने सांगितले. 

फजिली म्हणाला, "पोलिसांनी सुमारे 200 कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने आमच्या सह्या घेतल्या. 'तुम्ही निर्दोष आहात हे आम्हाला माहिती आहे. मात्र, या प्रकरणात तुमच्यावर गुन्हे दाखल करायचे शेकडो मार्ग आम्हाला माहीत आहेत, असे पोलिस आम्हाला म्हणत असत." 

दिल्ली पोलिसांच्या कोठडीत 50 दिवस ठेवल्यावर आम्हाला तिहार तुरुंगात हलविण्यात आले तेव्हा आमचे हाल थांबले. मात्र, तिहार कारागृहात इतर कैद्यांकडून आमच्या जिवाला धोका होता, असे त्याने सांगितले. 
 

Web Title: 2005 Delhi serial blasts: Forced us to eat faeces, says Fazili