नक्षलवादी हल्ल्यात 26 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

आधी नक्षलवाद्यांनी आमचा ठावठिकाणा शोधण्यासाठी गावकऱ्यांना पाठविले. त्यानंतर जवळपास 300 नक्षलवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्हीही गोळीबार केला आणि त्यांचे भरपूर जण ठार मारले. मी तीन-चार नक्षलवाद्यांच्या छातीत गोळ्या घातल्या. 
- शेर महंमद, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला 'सीआरपीएफ'चा जवान 

रायपूर - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 26 जवान हुतात्मा झाले, तर सहा जवान जखमी झाले. हुतात्मा झालेले सर्व जवान हे "सीआरपीएफ'च्या 74व्या बटालियनचे आहेत. 2010नंतर नक्षलवाद्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. 

नक्षलवादी कारवायांचा सर्वाधिक फटका बसलेल्या बस्तर विभागातील कालापत्थर भागात सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा हल्ला झाला. "सीआरपीएफ'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की या भागात रस्ता तयार करणाऱ्या कामगारांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी पार पाडत असताना नक्षलवाद्यांनी "सीआरपीएफ'च्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या वेळी नक्षलवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या गोळीबारात 26 जवान हुतात्मा झाले असून, सहा जवान जखमी झाले. जखमी झालेल्या काही जवानांची प्रकृती गंभीर असून, त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने रायपूर आणि जगदलपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

नक्षलवादविरोधी मोहिमेअंतर्गत सुकमा जिल्ह्यातील या भागात "सीआरपीएफ'ची 74वी बटालियन तैनात करण्यात आली आहे. नक्षलवादी हल्ल्यानंतर घटनास्थळाकडे जवळच्या "सीआरपीएफ'च्या तळाकडून मोठी कुमक पाठविण्यात आली असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सुकमातील भीषण नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपला दिल्ली दौरा अर्ध्यावर संपवून छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह हे रायपूरमध्ये दाखल झाले. त्यांनी तातडीची बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला. 

सुकमा जिल्ह्यात 12 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात "सीआरपीएफ'चे 12 जवान हुतात्मा झाले होते. तसेच छत्तीसगडमधील दंतेवाड्यात 2010मध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात "सीआरपीएफ'चे तब्बल 76 जवान हुतात्मा झाले होते. 

"मी तीन नक्षलवाद्यांना गोळ्या घातल्या' 
""नक्षलवाद्यांनी सुरवातीला गावकऱ्यांना आमचे ठिकाण शोधण्यासाठी पाठवले आणि त्यानंतर सुमारे 300 नक्षलवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्हीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. मी स्वतः तीन नक्षलवाद्यांच्या छातीत गोळ्या घातल्या,'' अशी माहिती या हल्ल्यात जखमी झालेले "सीआरपीएफ'चे जवान शेर मोहंमद यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हंसराज अहीर उद्या सुकमात 
"सीआरपीएफ'च्या हुतात्मा जवानांकडे असलेली शस्त्रे, वायरलेस सेट आणि दारूगोळा नक्षलवादी लुटून घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा आणि पोलिस उप महानिरीक्षक सुंदरराज हे सुकमाकडे रवाना झाले आहेत. दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयानेही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली होती. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे मंगळवारी (ता. 25) सुकमाला जाणार असून, "सीआरपीएफ'चे महानिरीक्षकही सुकमात दाखल होणार आहेत. 

नक्षलवादाचा विळखा 
आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील उपेक्षितांना न्याय आणि समानता मिळवून देण्याच्या हेतूने सुरू झालेल्या लढ्याने गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादाचे स्वरूप धारण केले आहे. कर्करोगाप्रमाणे फैलावत चाललेला हा नक्षलवाद एकेक राज्य पोखरत असून, आता 13 राज्ये नक्षलग्रस्त झाली आहेत. 

- नक्षलवाद ही देशाच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेतील सर्वांत मोठी समस्या 
- आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणात कारवाया 
- नक्षलवाद्यांकडे अद्ययावत तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रे 
- दुर्गम डोंगराळ भागामुळे नक्षलवाद्यांना पकडण्यात अडथळे 

नक्षलवादी संघटना 
- पीपल्स गुरिल्ला आर्मी 
- पीपल्स वॉर ग्रुप 
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष 
- नक्षलवादी कम्युनिस्ट केंद्र 
- जनशक्तीसारखे टोकाच्या डाव्या विचारसरणीचे गट नक्षलवादी म्हणून सक्रिय

नक्षलवाद्यांचे मोठे हल्ले 
- 16 जुलै 2008 - ओरिसातील मलकंगिरी जिल्ह्यात सुरुंगाच्या स्फोटात पोलिस व्हॅन उडविली, 21 पोलिस मृत्युमुखी. 
- 29 जून 2008 - नक्षलविरोधी पथकाला घेऊन जाणाऱ्या नौकेवर ओरिसातील बालिमेला सरोवरात हल्ला, 28 जवान ठार. 
- 8 ऑक्‍टोबर 2009 - महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील लहेरी पोलिस ठाण्यावर हल्ला, 17 पोलिस ठार. 
- 30 सप्टेंबर 2009 - महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील कोरची आणि बेलगाव ग्रामपंचायतीची कार्यालये नक्षलवाद्यांनी पेटवून दिली. 
- 26 सप्टेंबर 2009 - छत्तीसगडच्या जगदलपूरमधील पैरागुडा गावात नक्षलवाद्यांनी भाजपचे बालाघाट येथील खासदार बळिराम कश्‍यप यांच्या मुलाची हत्या केली. 
- 4 सप्टेंबर 2009 - छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात आदेड गावात चार गावकऱ्यांची हत्या. 
- 31 जुलै 2009 - छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात विशेष पोलिस अधिकारी आणि आणखी एकाची हत्या. 
- 27 जुलै 2009 - छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात भूसुरुंगाच्या स्फोटात सहा जण ठार. 
- 23 जून 2009 - बिहारमधील लखिसराई जिल्ह्यात न्यायालयाच्या आवारात नक्षलवाद्यांनी गोळीबार करून चार साथीदारांची सुटका केली. 
- 16 जून 2009 - पालामाऊ जिल्ह्यातील बेहेराखंड येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंगाच्या स्फोटात 11 पोलिस अधिकारी ठार, दुसऱ्या घटनेत माओवाद्यांच्या हल्ल्यात चार पोलिस ठार. 
- 13 जून 2009 - बोकारोजवळील गावात घडवून आणलेल्या दोन स्फोटांत दहा पोलिस ठार, अनेक जखमी. 
- 10 जून 2009 - झारखंडमधील सारंदा जंगलाच्या परिसरात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा पोलिस ठार. 
- 22 मे 2009 - महाराष्ट्रात गडचिरोलीजवळील जंगलात माओवाद्यांच्या हल्ल्यात 16 पोलिस ठार. 
- 22 एप्रिल 2009 - सुमारे 300 प्रवासी असलेल्या रेल्वेगाडीचे माओवाद्यांकडून अपहरण, नंतर सर्वांची सुटका. 
- 13 एप्रिल 2009 - ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात निमलष्करी दलाचे 10 जवान ठार. 
- 15 फेब्रुवारी 2010 - पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात इस्टर्न फ्रंटियर रायफल्सचे 24 जवान ठार. 
- 4 फेब्रुवारी 2010 - ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंगाच्या स्फोटात 11 जवान ठार. 
8 मे 2010 - छत्तीसगडमधील बिजापूर येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्यात 8 जण मृत्युमुखी. 
29 जून 2010 - छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 26 जवान मृत्युमुखी. 
18 ऑक्‍टोबर 2012 - गया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 सीआरपीएफचे जवान मृत्युमुखी. 
25 मे 2013 - छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्यात महेंद्र कर्मा या कॉंग्रेसच्या नेत्यासह पक्षाचे 25 जण ठार. 
11 मार्च 2014 - छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 15 सुरक्षारक्षक ठार. 
12 मार्च 2017 - छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान मृत्युमुखी. 
24 एप्रिल 2017 - छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 24 जवान मृत्युमुखी.

छत्तीसगडमध्ये "सीआरपीएफ'च्या जवानांवर झालेला हल्ला हे भ्याड आणि निषेधार्ह कृत्य आहे. सुकमातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

सुरक्षा दलांच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळत असल्यामुळे नैराश्‍यातून केलेला हा हल्ला आहे. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. 
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री 

सुकमातील हल्ला ही दुर्दैवी घटना असून, सुरक्षा दलांवर झालेला हा मोठा आघात आहे. या हल्ल्याच्या मागील कारणांचा विस्तृत अभ्यास करण्यात येईल. 
- किरण रिज्जू, केंद्रीय गृह राज्यमंत्री 

सुकमातील नक्षलवादी हल्ल्यामुळे मी पूर्णपणे व्यथीत झालो आहे. 
- रमणसिंह, छत्तिसगडचे मुख्यमंत्री

Web Title: 26 CRPF personnel matryred in Naxal attack in Sukma district of Chhattisgarh