काश्‍मिरात दगडफेकीच्या 2600 घटनांची नोंद

पीटीआय
बुधवार, 4 जानेवारी 2017

काश्‍मीरमध्ये आतापर्यंत एकूण 21,216 दहशतवादी कारवायांची नोंद झाली असून, सीआयडीच्या माहितीनुसार, बुऱ्हाण वणीच्या मृत्यूनंतर येथील 59 तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाल्याचे मुफ्ती यांनी स्पष्ट केले. या तरुणांच्या पुनर्वसनासाठी मागे तयार केलेल्या योजनेनुसार त्यांना काही सवलती व आर्थिक मदत प्रदान केली जाते, याकडेही मुफ्तींनी लक्ष वेधले

जम्मू - बुऱ्हाण वणीचा खातमा केल्यानंतर काश्‍मिरात भडकलेल्या हिंसाचारादरम्यान दगडफेकीच्या 2 हजार 690 घटना नोंद झाल्या असून, जवळपास 16 ठिकाणी शस्त्रचोरीचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज विधानसभेत दिली.

आमदार अब्दुल राशीद व मुबारक गुल यांनी याबाबतची माहिती मागवली होती. नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत सुरक्षा यंत्रणेने 463 जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी 145 जणांची मुक्तता करण्यात आली असून, डिसेंबरअखेर 318 जण अद्याप ताब्यात असल्याचे मुफ्ती यांनी सांगितले. 2015 मध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या तुलनेत 2016 मध्ये त्याचे प्रमाण वाढले असून, 2015 मध्ये 143, तर 2014 मध्ये 151 चकमकींची नोंद झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

काश्‍मीरमध्ये आतापर्यंत एकूण 21,216 दहशतवादी कारवायांची नोंद झाली असून, सीआयडीच्या माहितीनुसार, बुऱ्हाण वणीच्या मृत्यूनंतर येथील 59 तरुण दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाल्याचे मुफ्ती यांनी स्पष्ट केले. या तरुणांच्या पुनर्वसनासाठी मागे तयार केलेल्या योजनेनुसार त्यांना काही सवलती व आर्थिक मदत प्रदान केली जाते, याकडेही मुफ्तींनी लक्ष वेधले.

दहशतवादी पुनर्वसन योजना
दहशतवादी संघटनांत प्रवेश केलेल्यांसाठी 2004 मध्ये तयार केलेल्या एका योजनेनुसार, शरणागती पत्करणाऱ्याला 1 लाख 50 हजार रुपयांची मुदत ठेव, तसेच तीन वर्षांपर्यंत दरमहिना 2 हजार रुपयांचे अर्थसाह्य उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती मुफ्ती यांनी दिली.

धुमसते काश्‍मीर (2016 वर्षभरात)
- 216 एकूण चकमकी
- 150 दहशतवाद्यांचा खात्मा
- 81 जवान व पोलिस कर्मचारी हुतात्मा
- 2690 दगडफेकीच्या घटना
- 16 शस्त्रचोरीचे प्रकार
- 76 नागरिकांचा मृत्यू
- 59 दहशतवादी संघटनेत दाखल तरुण

Web Title: 2600 stone pelting incidents in J & K