सत्तावीस खासदारांनी घेतली शपथ

पीयूष गोयल, महाडिक, बोंडे यांचा समावेश
oath
oathsakal

नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित ५७ पैकी २७ खासदारांनी आज संसदभवनात पद गोपनियतेची शपथ घेतली. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, कॉंग्रेसचे खासदार जयराम रमेश, मुकुल वासनिक यांच्यासह महाराष्ट्रातील धनंजय महाडीक आणि अनिल बोंडे या खासदारांनीही शपथ घेतली. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल, कॉंग्रेसचे इम्रान प्रतापगढी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, तसेच कॉंग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांचा शपथ न घेऊ शकणाऱ्यांमध्ये समावेश आहे. पी. चिदंबरम तामिळनाडूतून तर सुरजेवाला हे राजस्थानातून निवडून आले आहेत. ५७ पैकी १४ खासदारांना पुन्हा राज्यसभेवर येण्याची संधी मिळाली आहे. राज्यसभेच्या सभागृहामध्ये उपराष्ट्रपती आणि सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली.

दहा राज्यांमधील खासदारांनी नऊ भाषांमध्ये शपथ घेतली. त्यामध्ये मराठीतून शपथ घेणाऱ्या महाराष्ट्रातील धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे या दोन्हीही खासदारांचा समावेश होता. पीयूष गोयल यांच्यासह १२ खासदारांनी हिंदीतून शपथ घेतली. इंग्रजीतून शपथ घेणारे ४ खासदार होते.

उर्वरित खासदारांनी संस्कृत, कन्नड, उडिया, पंजाबी, तमीळ आणि तेलुगू या भाषांमधून शपथ घेतली. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते परंतु राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आलेले मुकुल वासनिक, विवेक तनखा, सुरेंद्र सिंह नागर, डॉ. के. लक्ष्मण, उत्तर प्रदेशातील डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयी, राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी, यांनीही आज शपथ घेतली.

शपथ न घेऊ शकलेल्यांनाही अधिकार

राज्यसभेवर निवडून आलेल्या निम्म्याहून अधिक खासदारांनी अद्याप शपथ घेतली नसल्याने १८ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये त्यांच्या मताधिकाराबद्दल काही खासदारांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर खुलासा करताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी, हे खासदार शपथ झाली नसतानाही या निवडणुकीत मतदान करू शकतात, असे स्पष्ट केले. राज्यसभेची निवडणूक जिंकल्याची अधिसूचना निघताच विजयी उमेदवार हे राज्यसभेचे खासदार मानले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com