देशातील 293 धरणांची उलटली शंभरी 

पीटीआय
मंगळवार, 30 जुलै 2019

 देशातील सुमारे 293 मोठ्या धरणांची शंभरी उलटलेली आहे, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

नवी दिल्ली -  देशातील सुमारे 293 मोठ्या धरणांची शंभरी उलटलेली आहे, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सोमवारी लोकसभेत दिली. धरण सुरक्षेवरील विधेयक त्यांनी आज सभागृहात मांडले. 

धरणांच्या दुर्घटना टाळण्यासाठी धरण सुरक्षेसाठी राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाबरोबरच राष्ट्रीय समिती स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या विधेयकानुसार धरण सुरक्षेसाठीच्या निकषांकडे लक्ष देईल, तसेच धरणाच्या संरक्षणासाठी धोरण निश्‍चित करेल, असे सांगण्यात आले. शेखावत म्हणाले, ""भारतात पाच हजार 344 मोठी धरणे आहेत. त्यापैकी 293 धरणे ही 100 वर्षांपूर्वीची आहेत. यातील एक हजार 41 किंवा 20 टक्के धरणे ही 50 ते 100 वर्षांची आहेत. देशातील 92 टक्के धरणे ही आंतरराज्य नद्यांवर बांधलेली आहेत.'' 

राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण हे धरणांवर योग्य देखरेख ठेवण्यासाठी धोरण आखणे, नियमावली व निकष ठरविणे, विशिष्ट धरणांची देखभाल व दुरुस्ती करणे आदींची नियामक संस्था आहे. दोन राज्यांमधील राज्य धरण सुरक्षा संघटनांमधील समस्यांवर मार्ग काढण्याची जबाबदारीही या संस्थेची आहे. धरण सुरक्षा विधेयक हे 2018मध्ये लोकसभेत सादर झाले होते. मात्र, संसद विसर्जित करण्यात आल्याने ते प्रलंबित होते. 

धरणांचे वयोमान 

5,344   - एकूण मोठी धरणे 

293  - 100 वर्षांपेक्षा जुनी 

1,041  - 50 ते 100 वर्षांची 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 293 large dams in the country complete the hundred years

टॅग्स