Corona: 30 कोटी भारतीयांना पहिल्यांदा दिली जाईल लस; वाचा कोणाला मिळेल

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 October 2020

 भारतात कोरोना महामारी लसीकरण मोहिमेची तयारी सुरु करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- भारतात कोरोना महामारी लसीकरण मोहिमेची तयारी सुरु करण्यात आली आहे. प्राथमिकतेने 30 कोटी लोकांना कोरोना लशीचा डोस दिला जाणार आहे, यासाठी यादी तयार केली जात आहे. जास्त लोकसंख्या असलेले भाग, फ्रंटलाईन वर्कर्स जसे की डॉक्टर, नर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी अशांना अगोदर लस दिली जाणार आहे. 30 करोड लोकांसाठी कोरोना लशीचे 60 कोटी डोस लागणार आहेत. लशीला मंजूरी मिळाल्यास, त्यानंतर लशीचा डोस दिला जाईल. 

प्राथमिकता यादीमध्ये चार भाग करण्यात आले आहेत, 50 ते 70 लाख हेल्थेकेअर वर्कर्स, दोन करोड फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षे वयापुढील 26 कोटी लोक आणि 50 वर्षापेक्षा कमी वयाच्या पण ज्यांना इतर आजार आहेत, अशांचा यात समावेश करण्यात येणार आहे. कोरोना लशीसंबंधी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटाने योजनेचा मसुदा तयार केला आहे. केंद्र आणि राज्यांकडून माहिती घेण्यात आली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 23 टक्के लोकसंख्येला लस दिली जाणार आहे. 

कोरोनासंबंधी चांगली बातमी; अडीच महिन्यात पहिल्यांदाच झालं असं

तज्ज्ञ कमिटीनुसार, देशात सरकारी आणि खाजगी क्षेत्रात मिळून 70 लाख आरोग्य कर्मचारी आहेत. ज्यातील 11 लाख एमबीबीएस डॉक्टर्स, 8 लाख आयुष प्रॅक्टिशनर्स, 15 लाख नर्सेस, 7 लाख एएनएम आणि 10 लाख आशा वर्कर्स आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, यादी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. 

योजनेनुसार 45 लाख पोलिस आणि अन्य सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. लष्करातील 15 लाख लोकांनाही या यादीमध्ये घेण्यात आले आहे. याशिवाय पब्लिक ट्रान्सपोर्टमधील कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि शिक्षकांचाही समावेश केला जाणार आहे. यांची संख्या जवळजवळ 1.5 कोटी गृहीत धरण्यात आली आहे. 50 वर्ष वयापुढील नागरिकांनाही कोरोनाची लस पहिल्या टप्प्यामध्ये देण्यात येणार आहे. शिवाय डायबिटिज, हृद्यासंबंधी आजार, किडनी फेलीयर, फुफ्फुसासंबंधी आजार, कँसर या आजारांशी झुंजणाऱ्या लोकांना प्राथमिकतेने लस दिली जाणार आहे. 

एका व्यक्तीसाठी कोरोना लशीचे दोन डोस लागणार आहेत. त्यामुळे 30 कोटी जनतेसाठी 60 कोटी डोस लागतील. देशभरात या लशींचा पुरवढा करण्यासाठी स्टॉक पोजिशन, स्टोरेज फॅसिलिटी, जियोटॅग अशा प्रकारच्या उपाय योजना केल्या जात आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 crore Indians will get corona vaccine first Indian government