कोरोनासंबंधी चांगली बातमी; अडीच महिन्यात पहिल्यांदाच झालं असं

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 October 2020

जगासह भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

नवी दिल्ली : जगासह भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असले तरी भारतामध्ये कोरोना महामारीचा वेग मंदावल्याचं दिसून येत आहे. शिवाय कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतात अडीच महिन्यानंतर पहिल्यांदाच सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे भारतीय कोरोनावर मात करत असल्याचं दिसून येत आहे. 

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 62,212 नवे रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारी सकाळी आठपासून ते शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. या 24 तासात 70,816 इतके रुग्ण बरे झाले. सापडलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही अधिक असल्याने ही दिलासादायक बाब आहे. सध्या देशात 7,95,087 इतके सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत जवळजवळ 10 लाख टेस्ट झाल्या आहेत. आतापर्यंत आपल्या देशात 9,32,54,017 इतक्या टेस्ट झाल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. शुक्रवारी 837 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 65,24,595 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात 1,12,998 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कंगना रनौत विरोधात बांद्रा कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे दिले आदेश

भारतासहित जगभरातील 180 हून अधिक देशांत कोरोना विषाणूचा कहर माजला आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. भारतातदेखील कोरोनाचा हाहाकार माजला असून हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आतापर्यंत जगात 3.93 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. भारतात दररोज या विषाणूच्या संक्रमणाचे रुग्ण वाढतच आहेत. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, देशांत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ही 74,32,680 इतकी झाली आहे. 

दरम्यान, कोरोनाचा कहर वाढत असताना या विषाणूला हरवू शकणारी प्रभावी लस केव्हा येईल याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सध्या 150 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत. यातील 10 उमेदवार कोरोना लस निर्मितीच्या  तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहेत. भारतातील तीन लशी चाचणीच्या वैद्यकीय टप्प्यात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india corona virus update covid patient decreasing