भारतात 38 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला; हर्ड इम्युनिटीला सुरुवात?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 26 October 2020

भारतात आतापर्यंत 38 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी महामारीचा प्रादुर्भाव अजून थांबला नाही. देशात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झाल्याचे स्वीकारण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात आतापर्यंत 38 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. तसेच देश हर्ड इम्युनिटीच्या जवळ पोहोचला असल्याचे सांगण्यात आले आहे. 

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चने भारतातील कोरोना विषाणूसंबंधी एक अभ्यास पब्लिश केला आहे, ज्यात Susceptible-asymptomatic-infected-recovered (SAIR)मॉडलनुसार अभ्यास करण्यात आला आहे. या मॉडेलनुसार, आतापर्यंत 38 कोटी लोक हर्ड कम्युनिटीच्या स्टेटपर्यंत पोहोचले आहेत, असे असले तरी अजूनही धोका टळला नाही. स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. 

अभ्यासानुसार, भारतात वेळेवर आणि कठोर लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला. जर मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला नसता, तर जूनमध्येच पीक आला असतात. अशा परिस्थितीत 1.4 कोटी लोकांना कोरोना झाला असता आणि 26 लाख मृत्यू झाले असते.  

हा नवा भारत, जेथे संकट दिसेल तेथे पहिला वार करु; अजित डोवालांचा इशारा 

SAIR मॉडेलनुसार देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात कोविड-19 चाचण्या झाल्या आहेत. असे खूप लोक आहेत ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, पण याबाबतची माहिती नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार देशात 17 सप्टेंबर रोजी पीक आला होता. दिल्लीमध्ये कोरोनाची दुसरी लाट एक आठवड्यापूर्वी आली होती. दिल्लीतील सिरो सर्वे आतापर्यंत 24 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगतो. 

दरम्यान, कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात 50 हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 79 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक दिवसानंतर कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांपेक्षा कमी आढळली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 38 crore people in india infected with corona herd immunity