हा नवा भारत, जेथे संकट दिसेल तेथे पहिला वार करु; अजित डोवालांचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 26 October 2020

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी चीन आणि पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे.

नवी दिल्ली- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी चीन आणि पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. विजयादशमी निमित्त आयोजित एका संतांच्या कार्यक्रमात बोलताना डोवाल म्हणाले की, ''आताचा भारत नव्या पद्धतीने विचार करणारा आहे. आम्ही भारतातच नाही तर विदेशी भूमितही लढू. जिथे आम्हाला संकट दिसून येईल, तेथे आम्ही प्रहार करु.'' 

डोवाल उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये परमार्थ निकेतन आश्रमला संबोधित करत होते. आम्ही कोणावर पहिल्यांदा आक्रमण केले नाही. याविषयी प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत. जर कोठे संकट किंवा धोका दिसून आला तर तेथे वार करायला हवा होता. देशाला वाचवणे आवश्यक आहे. जेथे शत्रूची इच्छा आहे, तिथेच लढण्याची गरज नाही. आम्ही तेथे लढू जेथे आम्हाला धोका दिसेल आणि त्या धोक्याचा आम्ही सामना करु, असं अजित डोवाल म्हणाले आहेत. 

कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षांचा कारावास

परमार्थासाठी युद्ध करु

आम्ही कधीही स्वार्थासाठी युद्ध केलेले नाही. आम्ही युद्ध तर करणार. आमच्या जमिनीवर आणि बाहेरही युद्ध करणार, पण स्वत:च्या स्वार्थासाठी नाही, तर परमार्थासाठी आम्ही युद्ध करु. डोवाल यांनी आपल्या वक्तव्याद्वारे पाकिस्तान आणि चीनला इशारा दिल्याचे सांगितले जाते. पण, काहींनी यासंबंधी वेगळे मत व्यक्त केले आहे. डोवाल यांनी जे काही म्हटलं ते वेगळ्या संदर्भात होते. त्यांची टिप्पणी सध्याच्या संदर्भात कोणाच्याही विरोधात नाही, असं अधिकारिक सूत्रांचे मत आहे. 

काही दिवसांपूर्वी कोरियाई युद्धाच्या वर्धापणदिनानिमित्त चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी राष्ट्रवादी वक्तव्य केले होते. आम्ही आमचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या हितांना नुकसान पोहोचवण्याची परवानगी कोणालाही देणार नाही. आम्ही आमच्या देशात कसल्याही प्रकारची घुसखोरी आणि आमच्या पवित्र मातृभूमीचे विभाजन करण्याची परवानगी देणार नाही. जर अशी काही परिस्थिती निर्माण झाली, तर चिनी लोक त्याचा निश्चितपणे सामना करतील, असं ते म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य भारत, अमेरिका आणि तैवान संबंधात असल्याचे बोलले जाते. सध्या भारत, अमेरिका आणि तैवानसोबत चीनचे संबंध ताणले गेले आहेत.                                                                                           


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NSA ajit dowal warning to china pakistan