इराकमधील अपह्रत भारतीय तुरुंगात असण्याची शक्‍यता

पीटीआय
रविवार, 16 जुलै 2017

39 भारतीयांना "इसिस'ने सुरवातीला एका रुग्णालयाच्या इमारतीत आणि नंतर काही काळ एका शेतामध्ये ठेवले. यानंतर या सर्वांना मोसूल जवळील बाहुश येथील तुरुंगात त्यांना डांबण्यात आले आहे. या ठिकाणी अद्यापही दहशतवाद्यांबरोबर लढाई सुरू आहे

नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी इराकमध्ये "इसिस'ने ताब्यात घेतलेल्या 39 भारतीयांना मोसूलच्या जवळील बादुश येथील तुरुंगात ठेवले असण्याची शक्‍यता असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (रविवार) सांगितले. इराकचे पंतप्रधान 24 जुलैला भारतात येत असून त्यावेळी या भारतीयांबाबत अधिक माहिती मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

स्वराज यांनी या 39 व्यक्तींच्या कुटुंबीयांना भारत सरकारच्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. इसिसच्या ताब्यातून मोसूल मुक्त झाल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री व्हि. के. सिंह यांनी इराकचा दौरा केला. यावेळी त्यांना मिळालेली माहिती अपह्रतांच्या नातेवाईकांना देण्यात आली. या माहितीनुसार, 39 भारतीयांना "इसिस'ने सुरवातीला एका रुग्णालयाच्या इमारतीत आणि नंतर काही काळ एका शेतामध्ये ठेवले. यानंतर या सर्वांना मोसूल जवळील बाहुश येथील तुरुंगात त्यांना डांबण्यात आले आहे. या ठिकाणी अद्यापही दहशतवाद्यांबरोबर लढाई सुरू आहे. येथील लढाई संपल्यानंतर भारतीयांचा निश्‍चित ठावठिकाणा समजू शकेल, असे स्वराज यांनी सांगितले.

स्वराज यांनी इराकजवळील सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही चर्चा केली असून या भारतीयांना शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. आवश्‍यकता भासल्यास व्हि. के. सिंह हे पुन्हा इराकला जातील, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: 39 abducted Indians in Iraq may be in jail: Sushma Swaraj