बलात्काऱ्यांचा जागेवर ‘फैसला’

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 डिसेंबर 2019

शस्त्रे पळवून पोलिसांवर हल्ला
सायबराबादचे पोलिस आयुक्त सी. व्ही. सज्जनार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की दोन्ही आरोपींनी पोलिसांकडील शस्त्रे हिसकावून घेत गोळीबार केल्यानंतरच आम्ही त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यातील मोहंमद आरिफ या आरोपीने सर्वप्रथम गोळीबार केला. अन्य आरोपींनी काठी आणि दगडांनिशी पोलिसांवर हल्ला केला. या आरोपींच्या हातातील शस्त्रे अनलॉक होती. त्यामुळे ते आमच्या दिशेने गोळीबार करू शकले असते. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा आरोपींच्या हातामध्ये बेड्या नव्हत्या.

अशी झाली चकमक

  • आरोपींना पोलिसांनी पहाटे ५.४५ च्या सुमारास गाडीमधून घटनास्थळी आणले
  • आरोपींची पोलिसांवर दगडफेक अन्‌ हल्ला
  • आरोपी मोहंमद आरिफने बंदूक हिसकावली
  • पोलिसांच्या दिशेने आरिफचा गोळीबार
  • पोलिसांचा आरोपींना शरण येण्याचा इशारा
  • प्रत्युत्तरादाखल पोलिसांचाही गोळीबार
  • आरोपींचा घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न
  • पोलिसांनी पुन्हा केलेल्या गोळीबारात सर्वजण ठार, चकमक साधारणपणे सव्वासहाला संपली

तेलंगण पोलिसांची कारवाई; चौघेही चकमकीत ठार
हैदराबाद - पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्याचा आरोप असलेले चारही आरोपी आज पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ठार झाले. हैदराबादनजीक अत्याचार झालेल्या घटनास्थळी आज सकाळी ही चकमक घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, या चकमकीनंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, काहींनी याचे स्वागत केले; तर काहींनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेत चकमकीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आरोपींनी मूळ गुन्हा नेमका कसा केला, याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक या चारही आरोपींना घेऊन हैदराबादनजीकच्या घटनास्थळी गेले होते. तेव्हा हे आरोपी पोलिसांचीच शस्त्रे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला, यात चारहीजण घटनास्थळीच ठार झाले.. हैदराबाद पोलिसांच्या या एन्काउंटरवर आज देशभरात गल्लीपासून ते दिल्लीतील संसदेपर्यंत सर्वत्र पडसाद उमटले. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना पहाटेच घटनास्थळी आणले होते, ज्या ठिकाणी ही चकमक झाली, तो परिसर हैदराबादला लागूनच आहे.

महत्त्वाच्या बातम्या : उपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार ?

पोलिस अधिकारी गुन्ह्याची तालीम घेत असताना आरोपींनी त्यांची शस्त्रे बळकावित पोलिसांवर गोळीबार करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये चारही आरोपी मारले गेले. या चकमकीमध्ये दोन पोलिस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. प्रत्यक्ष चकमकस्थळी दहा पोलिसांची उपस्थिती होती. या चकमकीनंतर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक मोबाईल आणि दोन शस्त्रेही जप्त केली. या चारही आरोपींनी पशुवैद्यक असणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते, पोलिस चौकशीदरम्यान त्यांनी तशी कबुली दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या :  'या' ठिकाणी बुलेट ट्रेनची कारशेड  बांधल्यास 48 हजार कोटींचा तोटा 

या सर्वांना २९ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभरात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता. न्यायालयाने या चारही आरोपींना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. दरम्यान, पीडित तरुणीचे वडील आणि बहिणीने या चकमकीचे स्वागत करत तेलंगण पोलिसांचे आभार मानले आहेत. दिल्लीतील निर्भयाच्या माता-पित्यांनीही पोलिसांच्या या कृत्याचे समर्थन केले आहे. दरम्यान, या चकमकीचे वृत्त समजल्यानंतर लोकांनी तेलंगण पोलिस जिंदाबादच्या घोषणा देत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. काही महिलांनी मिठाई वाटून, फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

या चकमकीतील पोलिस अधिकाऱ्यांवर कसल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाऊ नये.
- निर्भयाची आई

हैदराबादेतील पीडितेच्या कुटुंबीयांना सात वर्षे वाट पाहावी लागली नाही. पोलिसांनी आरोपींना मारून योग्यच केले.
- निर्भयाचे वडील

या नराधमांना चकमकीत ठार मारण्यात आल्याचे आम्हाला टीव्हीवरूनच समजले, आम्ही आनंदी आहोत. मी तेलंगण सरकार आणि पोलिसांचे आभार मानतो. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही आभारी आहोत.
- हैदराबादेतील पीडितेचे वडील

हैदराबादेतील बलात्कारी चकमकीमध्ये मारले गेल्याने मी आनंदी आहे. यूपीतील प्रकरणातदेखील दोषींना अशीच शिक्षा द्यायला हवी.
- उन्नावमधील पीडितेचे वडील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 people who were charged in Hyderabad Rape case have been killed by Hyderabad Police