
Telangana मंत्र्यांच्या वाढदिवसाला गैरहजर; महापालिकेचे चार कर्मचारी निलंबीत
हैद्राबाद - तेलंगणाच्या बेल्लमपल्ली महानगरपालिकेच्या चार कर्मचार्यांना २४ जुलै रोजी मंत्री केटीआर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल निलंबीत करण्यात आलं आहे. बेल्लमपल्ली येथील सरकारी रुग्णालयात हा कार्यक्रम आयोजित केला होता. (Telangana civic employees suspended news in Marathi)
महापालिका आयुक्तांनी 25 जुलै रोजी चार कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली होती. त्यात, 24 तासांच्या आत गैरहजर राहिण्याचे कारण देण्यास सांगितले आहे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होईल.
नोटीसमध्ये म्हटलं की, माननीय नगरविकास मंत्री के. तारका रामाराव यांच्या वाढदिवसानिमित्त 24 जुलै रोजी बेल्लमपल्ली सरकारी रुग्णालयात सकाळी 10.00 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले होते. परंतु मॅसेजकडे दुर्लक्ष करण्यात आले. कार्यक्रमातील कमी उपस्थितीमुळे मेमो जारी करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास उपस्थित न राहिल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये असा प्रश्न उपस्थित करत २४ तासांच्या आत यावर स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा, तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि तुम्ही या मेमोला (sic) प्रतिसाद न दिल्यास तुमच्या वरिष्ठांना कळवले जाईल,” असे त्यात म्हटले आहे.
दरम्यान स्पष्टीकरणाची संधी न देता कामावरून काढून टाकण्यात आल्याचा आरोप निलंबित कर्मचाऱ्यांनी केला आहे. मंत्र्यांचा वाढदिवस साजरा करणे प्रोटोकॉलचा भाग का आहे, असा सवालही त्यांनी केला. दुसरीकडे टीआरएसने देखील मंत्री केटी रामाराव यांच्यासाठी सरकारी रुग्णालयात वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.