संसदेतील 43 टक्के खासदार 'बाहुबली'

वृत्तसंस्था
रविवार, 26 मे 2019

- अर्ध्या खासदारांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद
- 2014च्या तुलनेत 26 टक्‍क्‍यांची वाढ
- एडीआर या संस्थेचे सर्वेक्षण
- 539 पैकी 233 खासदारांच्या विरोधात गुन्हे

नवी दिल्ली: सतराव्या लोकसभेत निवडून आलेल्या जवळपास अर्ध्या खासदारांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, 2014 शी तुलना करता हे प्रमाण 26 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे "असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने म्हटले आहे. यंदा निवडून आलेल्या 539 पैकी 233 खासदारांच्या विरोधात म्हणजे 43 टक्के नेत्यांवर गुन्हे आहेत. 

भाजपमधील 116 खासदारांविरोधात म्हणजे तब्बल 39 टक्के नेत्यांविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, यानंतर कॉंग्रेसच्या 29 (57 टक्के), संयुक्त जनता दलाचे 13 (81 टक्के), "द्रमुक'च्या 10 (43 टक्के) आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नऊ (41 टक्के) खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद असल्याचे "एडीआर'ने म्हटले आहे. मागील म्हणजे 2014 मधील लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर तब्बल 185 (34 टक्के) खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद होती, तर 112 खासदारांवर गंभीर गुन्हे होते. 2009 मधील आकडेवारी लक्षात घेतली तर लोकसभेतील 543 पैकी 162 म्हणजे जवळपास 30 टक्के खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद होती, तर 14 टक्के खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

109 टक्‍क्‍यांची वाढ 
नव्या लोकसभेतील तब्बल 29 टक्के खासदारांवरील गुन्हे हे बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, महिलांविरोधातील गुन्हे अशा प्रकारचे असल्याचे "एडीआर'ने म्हटले आहे. 2009 पासूनचा काळ लक्षात घेतला तर गंभीर गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या खासदारांच्या संख्येमध्ये 109 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. अकरा विजेत्यांपैकी भाजपच्या पाच, "बसप'च्या दोन, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि वायएसआर कॉंग्रेसच्या प्रत्येकी एका आणि अन्य एका अपक्ष उमेदवाराविरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद आहे. 

कॉंग्रेस, भाजपचे "दागदार' 
मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांच्याप्रमाणे अनेक बाहुबली नेते भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. केरळच्या इडुक्की मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले डीन कुरियाकोसे यांच्याविरोधात 204 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात सदोष मनुष्यवध, घरफोडी, जबरी चोरी आणि गुन्हेगारी हेतूने कट आखणे आदींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 43% newly elected Lok Sabha MPs have criminal record