ओडिशा, कर्नाटकला ४,४३२ कोटी

पीटीआय
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

अशी आहे मदत (आकडे कोटी रुपयांत)
३३३८.२२ ओडिशा
१०२९.३९ कर्नाटक  
६४.४९ हिमाचल प्रदेश

नवी दिल्ली - दुष्काळ, भूस्खलन, चक्रीवादळाच्या संकटांना तोंड देणाऱ्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तसेच ओडिशा या राज्यांना केंद्र सरकारने ४४३२.१० कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीस मंजुरी दिली आहे. 

नैसर्गिक आपत्ती काळात केंद्रातर्फे राज्यांना मदतीसाठीच्या उच्चस्तरीय समितीची काल बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. गृहमंत्री अमित शाह हे समितीचे अध्यक्ष आहेत. यात हिमाचल प्रदेश तसेच कर्नाटकला २०१८-१९ या आर्थिक वर्षातील दुष्काळ, भूस्खलन, गारपीट, तर ओडिशाला फणी चक्रीवादळामुळे झालेल्या हानीसाठी मदतीचा निर्णय झाला. अर्थात, हे अर्थसाह्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये (एसडीआरएफ) दिलेल्या निधीच्या अतिरिक्त आहे. २०१८-१९ मध्ये सर्व राज्यांना ९,६५८ कोटी रुपये ‘एसडीआरएफ’साठी दिली होते. या वर्षात २४ राज्यांना आतापर्यंत ६,१०४ कोटी केंद्रातर्फे ‘एसडीआरएफ’अंतर्गत देण्यात आले आहेत.

इतर ठिकाणची स्थिती...
भोपाळ - केरवा धरणातून पाणी सोडल्यामुळे पुरात अडकलेल्या दोन गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. मध्य प्रदेशच्या आठ जिल्ह्यांत रेड ॲलर्ट जारी केला आहे. 

डेहराडून - उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी उत्तर काशीच्या पूरग्रस्त भागाचा विशेषत मोरी गटचा दौरा केला.  

अहमदाबाद - मुसळधार पावसामुळे गुजरातमधील केवडिया येथे नर्मदा धरणातील पाण्याची पातळी १३३ मीटरपर्यंत वाढली आहे. 

चंडीगड - पंजाब आणि हरियानात दिवसभर पाऊस नाही. आज उघडीप असतानाही दोन्ही राज्यातील अनेक भागात पूरस्थिती कायम असून बचावकायर सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4432 Crore Rupees Help to Odisaha Karnataka Flood