Modi Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळातील तब्बल 51 मंत्री कोट्यधीश

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जून 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवनियुक्त मंत्रिमंडळातील 57 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे करोडपती असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवनियुक्त मंत्रिमंडळातील 57 मंत्र्यांपैकी 51 मंत्री हे कोट्यधीश असल्याची माहिती 'असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स' (ADR) या संस्थेने जाहीर केली आहे.

पंजाबमधील अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर या सर्वांत श्रीमंत मंत्री ठरल्या आहेत, तर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले आणि ओडिशाचे 'नरेंद्र मोदी' अशी ओळख असलेले प्रताप सारंगी हे सर्वात गरीब खासदार ठरले आहेत. 

या यादीत दुसऱ्या स्थानी पियूष गोयल (95 कोटी) हे आहेत. तिसऱ्या स्थानी राव इंद्रजित सिंह (42 कोटी), तर चौथ्या स्थानी नवनियुक्त गृहमंत्री अमित शहा (40 कोटी) हे आहेत. 

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत 46 व्या क्रमांकांवर आहेत. मोदी यांच्याकडे २ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे, तर साध्वी निरंजन ज्योती, संजीवकुमार बलियान आणि किरण रिजिजू यांच्याकडे प्रत्येकी एक कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. 

तसेच रामेश्वर तेली (43 लाख), व्ही. मुरलीधरन (27 लाख), कैलाश चौधरी (24 लाख) आणि प्रताप सारंगी (13 लाख) यांच्याकडे एवढी संपत्ती असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची एकूण संपत्ती आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबतची माहितीही संस्थेने सादर केलेल्या अहवालात पाहायला मिळते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील 57 मंत्र्याचा शाही शपथविधी गुरुवार (ता.30) राष्ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदींच्या या मंत्रिमंडळात 24 कॅबिनेट, 9 राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) आणि 24 राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 51 ministers of Modi cabinet are crorepatis