'कधी रद्द होणार काळे कृषी कायदे?' गळफास घेत शेतकऱ्याची टिकरी बॉर्डरवर आत्महत्त्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

नव्या कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी घेऊन गेल्या 72 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांना रद्द करण्याची मागणी घेऊन गेल्या 72 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही या आंदोलकांचा निश्चय ढळला नहाीये. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक शेतकरी बेपत्ता झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी आत्महत्त्या देखील केल्या आहेत. आता आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्त्याने केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा शेतकरी काही दिवसांपूर्वीच आंदोलनात सामील झाला होता. तो मृत्यूपूर्वीच्या रात्री खूपच अस्वस्थ होता तसेच निराशाजनक भाषा बोलत होता. या शेतकऱ्याने रात्री उशीरा टिकरी बॉर्डरवर गळफास घेत आत्महत्त्या केली. शनिवारी सकाळी या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला.

हेही वाचा - लहान मुलांनाही लवकरच कोरोनाची लस; भारत ठरणार जगातील पहिला देश?

सुसाईड नोटदेखील लिहली
आत्महत्त्या करणारा शेतकरी जींदच्या सिंहवाला गावचा रहिवासी आहे. या शेतकऱ्याचं वय जवळपास 52 वर्षे होतं. या शेतकऱ्याचं नाव कर्मवीर पुत्र दरियाव सिंह असं असून त्याने एका झाडाला प्लस्टिकच्या दोरीने गळफास लावत आत्महत्त्या केली आहे. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांना त्याचा मृतदेह झाडाच्या फांदीला लटकलेला आढळून आला. घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील आढळली आहे. यामध्ये लिहलंय की, भारतीय किसान युनियन जिंदाबाद! हे मोदी सरकार तारीखेवर तारीख देत आहे. हे काळे कायदे कधी रद्द होतील याचा काहीच अंदाज नाहीये. 

या सुसाईड नोटमध्ये पुढे लिहलंय की, जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाहीत तोवर आम्ही इथू हटणार नाही. सकाळी गळफास घेतलेल्या या शेतकऱ्याबाबतची माहिती आंदोलकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाला फांदीवरुन खाली काढलं आणि पोस्टमार्टमसाठी सिव्हील हॉस्पिटलला पाठवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 year old farmer suicided at Tikri border demanding repeal of farm laws