
मुलांना लसीचे संरक्षण प्राप्त झालं तर निर्धास्तपणे त्यांना शाळेत पाठवता येईल, ही भावना पालकांमध्ये आहे.
नागपूर : भारतात कोरोना लसीकरणास गेल्या 16 जानेवारीपासून सुरवात झाली. मात्र, या लसीकरण मोहिमेमध्ये प्राधान्यक्रम ठरवून पहिल्या टप्प्यात फक्त फ्रंटलाईन वर्कर्स आणि 65 वर्षे वयावरील लोकांनाच ही लस देण्यात येत आहे. शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना शाळेत पाठवताना पालक चिंतीत आहेत. मुलांना लसीचे संरक्षण प्राप्त झालं तर निर्धास्तपणे त्यांना शाळेत पाठवता येईल, ही भावना आहे. आणि आता याच दृष्टीने भारतात पावले टाकली जात आहेत. कोव्हॅक्सिन या लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने आता लहान मुलांवर देखील लसीची चाचणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. येत्या फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरवातीला या लहान मुलांवरील चाचणीस सुरवात होऊ शकते. याबाबतच वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.
वय वर्षे 2 ते 18 असं या चाचणीसाठीचा वयोगट असणार आहे. शहरांतील प्रमुख लहान मुलांच्या दवाखान्यांमध्ये ही चाचणी पार पडली जाईल, असा अंदाज आहे. भारत सरकारकडून या प्रकारच्या मोहीमेसाठी सकारात्मकता मिळाल्यास भारत बायोटेक कंपनी ही चाचणी घेण्यास सर्वप्रकारे तयार असल्याचे समजत आहे. जानेवारी महिन्यामध्ये भारत बायोटेकचे प्रमुख एम डी क्रिष्णा इल्ला यांनी म्हटलं होतं की, येत्या चार महिन्यांमध्ये म्हणजेच मे 2021 पर्यंत लहान मुलांसाठी कोरोना लस तयार होईल. असं झालं तर जगात भारत हा पहिलाच देश ठरेल जो अगदी 2 वर्षे वयाच्या लहान बाळापासून ते 18 वर्षे वयाच्या किशोरवयीन मुलांवर लसीची चाचणी घेईल, लसीच्या चाचण्यांसाठीचे कोओर्डीनेटर डॉ. ताजने यांनी म्हटलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, नागपूर हे कोव्हॅक्सिन लसीच्या पहिल्या, दुसऱ्या तसेच तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. लवकरच नाकाद्वारे लस देण्यासही सुरवात होईल. मात्र लहान मुलांवरील चाचण्यांचे महत्त्व वेगळे असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी म्हटलं की, या चाचण्या वय वर्षे 2 ते 5, वय वर्षे 6 ते 12, आणि वय वर्षे 12 ते 18 अशा टप्प्यांमध्ये लसीकरणाच्या चाचण्या घेतल्या जातील. यासाठी विशेष प्रोटोकॉल देखील पाळला जाईल कारण कोरोनाविरोधातील लढ्यासाठीचा हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे.