अबब! मुलाच्या तोंडातून निघाले तब्बल 526 दात

पीटीआय
बुधवार, 31 जुलै 2019

माणसाच्या तोंडात 32 दात असतात; पण चेन्नईतील एका मुलाच्या तोंडातून डॉक्‍टरांनी तब्बल 526 दात बाहेर काढले आहेत! अवघे सात वर्षांचे वय असलेल्या या मुलाच्या तोंडात एवढे दात कसे, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एवढे दात निघण्याचा हा जागतिक विक्रम असल्याचा दावाही केला जात आहे. 

चेन्नई : माणसाच्या तोंडात 32 दात असतात; पण चेन्नईतील एका मुलाच्या तोंडातून डॉक्‍टरांनी तब्बल 526 दात बाहेर काढले आहेत! अवघे सात वर्षांचे वय असलेल्या या मुलाच्या तोंडात एवढे दात कसे, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. एवढे दात निघण्याचा हा जागतिक विक्रम असल्याचा दावाही केला जात आहे. 

रवींद्रनाथ असे या मुलाचे नाव आहे. त्याचे तोंड सुजल्याने दात किडला असेल म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला डॉक्‍टरकडे आणले. त्या वेळी त्याच्या हड्डीच्या जबड्याला अनेक दात जोडलेले असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करून त्याचे 21 दात वगळता सर्व 526 दात बाहेर काढले. चेन्नईच्या सविता डेंटल कॉलेजमध्ये ही सर्जरी करण्यात आली. 

ही सर्जरी करण्यासाठी मुलाचे पालक तत्काळ तयार झाले; पण रवींद्रनाथला समजावण्यात डॉक्‍टरांना बराच वेळ गेला. त्याची संमती मिळताच शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल पाच तास चालली. डॉक्‍टरांनी त्याच्या तोंडातून 526 दात काढले असले तरी एवढे दात नेमके कशामुळे आले, याचे कोडे मात्र डॉक्‍टरांना अद्याप सुटलेले नाही.

मोबाईल टॉवरच्या किरणोत्सर्गामुळे आणि अनुवांशिक कारणामुळेही हे होऊ शकते, असे मत सविता डेंटल कॉलेजचे डॉक्‍टर सेंथिलनाथन यांनी व्यक्त केले. यापूर्वी 2014 मध्ये मुंबईतील एका मुलाच्या तोंडातून 232 दात काढण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 526 teeth in the mouth of Boy