पाकिस्तानच्या तुरुंगात 537 भारतीय कैदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पाकिस्तानमधील तुरुंगात असलेल्या 537 भारतीय कैद्यांची यादी पाकिस्तानने भारताला दिली आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करारातील तरतुदीनुसार ही यादी मंगळवारी देण्यात आली.
 

इस्लामाबाद- पाकिस्तानमधील तुरुंगात असलेल्या 537 भारतीय कैद्यांची यादी पाकिस्तानने भारताला दिली आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करारातील तरतुदीनुसार ही यादी मंगळवारी देण्यात आली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार 537 कैद्यांमध्ये 54 सामान्य नागरिक व 483 मच्छीमार आहेत. पाकिस्तान सरकारने 537 भारतीय कैद्यांची यादी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांकडे दिली असल्याचे यात नमूद केले आहे.

भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये प्रतिनिधीला भेट देण्याच्या परवानगीसंबंधीचा करार 21 मे 2008 रोजी झाला. त्यानुसार कैद्यांची यादी भारताला दिली असल्याचे पाकिस्तानने सांगितले. या करारानुसार वर्षातून दोन वेळा म्हणजे 1 जानेवारी व 1 जुलै या दिवशी दोन्ही देशांनी एकमेकांकडील कैद्यांच्या यादीचे आदान-प्रदान करणे अपेक्षित असते. यानुसार भारताकडूनही पाकिस्तानी कैद्यांची यादी नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात देण्यात येते.

दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती असतानाही ही प्रथा पाळण्यात येते. दरम्यान, अरबी समुद्रात सीमा रेषा आखलेली नसल्याने दोन्ही देशांमधील मच्छीमारांकडून एकमेकांची हद्द ओलांडून बेकायदा मासेमारी करण्याच्या घटना अनेकदा घडतात.

Web Title: 537 Indian Prisoners Lodged In Pakistan Jails Say Officials