Breaking : तेलगंणच्या ६ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू; निजामुद्दीन येथील कार्यक्रमात झाले होते सहभागी!

वृत्तसंस्था
Tuesday, 31 March 2020

शुक्रवारी (ता.२७) अंदमान आणि निकोबार बेटांवरील ६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ते लोकही निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हैदराबाद : दिल्लीतील निजामुद्दीन येथे १३ ते १५ मार्च या कालावधीत आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा सोमवारी (ता.३०) मृत्यू झाला. यापैकी दोघांचा गांधी हॉस्पिटल, तर अपोलो, ग्लोबल, निजामाबाद आणि गढवाल येथील हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, अशी माहिती तेलंगण मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निजामुद्दीन येथील आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी स्वत: याबाबतची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या जवळपास २०० लोकांना कोरोनाची लागण झाल्याच्या चर्चेला सोमवारी राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात उधान आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचा शोध सुरू असून सुमारे २००० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

- Lockdown : 'होय, आपण संसर्गाच्या मोठ्या टप्प्यावर'; आरोग्य खात्याचा इशारा!

मौलानाविरोधात एफआयआर दाखल 

निजामुद्दीन येथील नियोजित धार्मिक कार्यक्रमाप्रकरणी मौलानाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. या भागातील प्रत्येक घर सॅनिटाइज करण्यात येणार असून पोलिसांची ड्रोनद्वारे पूर्ण भागावर लक्ष्य राहणार आहे. 'तबलीगी जमात' या इस्लामी संघटनेने सदर कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमात इंडोनेशिया, मलेशियासह अन्य देशातील सुमारे २००० लोक सहभागी झाले होते. 

- न्यूयॉर्क शहर अमेरिकेतील 'वुहान' होण्याची शक्यता; एका दिवसात हजार बळी

दिल्लीतील ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत, ते सर्वजण निजामुद्दीन दर्गाह परिसरातील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमास विविध राज्यांतील ५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. आणि ते सर्वजण आपापल्या राज्यात परत दाखल झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आणखी वाढली आहे. 

- धक्कादायक:  कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने घातली आंघोळ; योगी सरकारवर टीकेचा भडीमार!

मिळालेल्या माहितीनुसार, २०-३० बसगाड्यांमधून हे सर्वजण आपापल्या घरी परतले असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच शुक्रवारी (ता.२७) अंदमान आणि निकोबार बेटांवरील ६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ते लोकही निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 people who attended Nizamuddin congregation dead says Telangana govt