धक्कादायक:  कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने घातली आंघोळ; योगी सरकारवर टीकेचा भडीमार!

वृत्तसंस्था
Monday, 30 March 2020

अतिउत्साही महानगरपालिका आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना बस सॅनिटाइज करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी कामगारांनाच अंघोळ घातली.

लखनऊ : कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत चालल्याने सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे कामगार आणि कष्टकरी वर्गाचे हाल सुरू झाले. खाण्या-पिण्याची आबळ होऊ लागल्याने शेवटी त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, शहरातून गावी पोहोचताच या कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने अंघोळ घालण्यात आली. हा धक्कादायक प्रकार घडला आहे योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्थलांतरीत झालेल्या कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने अंघोळ घातल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या प्रकरणाची माहिती होताच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

प्रियांका यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'कृपया अशा प्रकारचे अमानवी कृत्य करू नये. आपण सर्वजण एकत्रितपणे कोरोनावर मात करू.  कामगारांनी खूप गोष्टी अगोदरच सहन केल्या असताना त्यांना केमिकलयुक्त पाण्याने अंघोळ घालून त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.'

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू

दुसरीकडे, महाराष्ट्राचे कॅबिनेटमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते जयंत पाटील यांनीही या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियांका गांधी यांचे ट्विट रिट्विट करत त्यांनी प्रियांका यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. या अमानवी कृत्याचा मी निषेध करत आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, स्थलांतरीत आणि कामगारांना जिथे असाल, त्याच जागी राहण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, उत्तर प्रदेशमधील बरेली येथे घडलेल्या या प्रकाराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. क्लोरीनयुक्त पाणी या कामगारांवर फवारण्यात आले असून दुसऱ्या कोणत्याही रसायनाचा वापर करण्यात आला नव्हता, असे स्पष्टीकरण अशोक गौतम यांनी 'द हिंदू' या वृत्तसंस्थेशी बोलताना दिले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आम्ही त्यांच्यावर फवारणी करत आहोत, असा युक्तिवाद गौतम यांनी केला आहे. 

- सकाळ ब्रेकिंग : एमएपीएसीसह विद्यापीठांच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर 

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अतिउत्साही महानगरपालिका आणि फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना बस सॅनिटाइज करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी कामगारांनाच अंघोळ घातली. या सर्व कामगारांची नंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

- coronavirus - कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: migrant workers get forcefully sanitized by chemical in UP