90 किलोचा माणूस वरून पडला अन् गेला दुसराच...

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जून 2019

मी गच्चीमध्ये बसून मोबाइलवर बोलत होतो. त्यावेळी अचानक माझा तोल गेला व मी खाली पडलो.

नवी दिल्लीः इमारतीच्या तिसऱया मजल्यावरून नव्वद किलोचा माणूस खाली पडला आणि दुसऱयाच व्यक्तीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिसऱया मजल्यावरून पडलेली व्यक्ती चमत्कारिकरित्या बचावली आहे.

दिल्लीच्या साराई रोहिल्ला भागात शनिवारी (ता. 22) रात्री हा विचित्र अपघात घडला आहे. साराई रोहिल्ला भागात राहणारे मदन लाल (वय 60) रात्री आपल्या हातगाडीवर झोपले होते. त्याचवेळी शेजारच्या इमारतीत तिसऱया मजल्यावर रहाणारे रविंद्र यांचा तोल गेला व गच्चीवरुन ते खाली पडले. इमारतीवरून खाली पडताना ते मदन लाल यांच्या अंगावर जाऊन कोसळले. त्यामुळे रविंद्र यांचे प्राण बचावले. मात्र, रविंद्र (वजन 90 किलो) यांच्या वजनाने मदन लाल यांचा मृत्यू झाला. रविंद्र हे किरकोळ जखमी झाले आहेत.

रविंद्र म्हणाले, शनिवारी रात्री मी गच्चीमध्ये बसून मोबाइलवर बोलत होतो. त्यावेळी अचानक माझा तोल गेला व मी खाली पडलो. उंचावरुन पडलो आणी माझ्या वजनामुळे मदन लाल यांच्या बरगडया मोडल्या होत्या. शिवाय, इतर अवयवानांही जखमा झाल्या होत्या.' दरम्यान, घटना घडण्यापूर्वी मदन लाल हे त्यांच्या नातीसोबत खेळत होते. नात घरात झोपल्यानंतर ते 10.30च्या सुमारास घराबाहेर झोपण्यासाठी आले होते. रविंद्र हे मदन लाल यांच्या अंगावर पडल्यानंतर मोठा आवाज झाला होता. आवाजानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. उपचारापूर्वीच मदन लाल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 year old dies as 90kg man falls on him from 3rd floor at delhi