कोरोना लशीच्या आढाव्यासाठी 64 देशांचे प्रतिनिधी भारत दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

अलिकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लसनिर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला होता. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर अद्याप जगात कोणताही ठोस उपचार उपलब्ध झाला नाहीये. कोरोनाच्या विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी जगभरात लसनिर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतात देखील लसनिर्मितीची प्रक्रिया सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. भारतातील लसनिर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जगभरातील 60 हून अधिक देशांचे प्रतिनिधी आज भारत दौऱ्यावर येणार आहेत. अलिकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लसनिर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला होता. 

आज 64 देशांचे प्रतिनिधी कोरोना लशीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे. भारतातील आघाडीच्या कंपन्यांना भेट देऊन कोरोना विषाणूला प्रतिबंध घालणाऱ्या लशींबाबत ते माहिती घेणार आहेत. सर्वांत आधी ते हैद्राबाद मधील भारत बायोटेक कंपनीमध्ये जाणार आहेत. त्यानंतर ते इतर शहरांमधील लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्याना हे प्रतिनिधी भेट देतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने परवा 6 डिसेंबर रोजीच या परदेशी प्रतिनिधींच्या दौऱ्याविषयीची माहिती जाहीर केली होती. 60 हून अधिक देशातील कोरोनाच अभियानाचे प्रमुख प्रतिनिधी  भारतात येणार आहेत. ते आधी बायोटेक कंपनी भारत बायोटेकला भेट देतील. त्यानंतर ते बायोलॉजिकल ई ला भेट देणार आहेत. या प्रतिनिधींमध्ये इराण, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, भूटान, म्यानमार, टोबॅगो, दक्षिणकोरिया, श्रीलंका इत्यादी देशांचे प्रतिनिधी असणार आहेत. याप्रकारच्या परदेशी प्रतिनिधींचा हा पहिलाच दौरा आहे. 

हेही वाचा - मोठी बातमी : पुलवामात दोन दहशतवादी ठार; सर्च ऑपरेशन सुरु

लुक्झेंबर्गमधील 'बी मेडिकल सिस्टीम' ही कंपनी भारतामध्ये मार्च महिन्यापर्यंत तयार झालेल्या लशीच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची सुविधा देणार आहे. या कंपनीचे सीईओ एल. प्रोवोस्ट यांचाही या दौऱ्यामध्ये सहभाग असणार आहे. याबाबत प्रोवोस्ट म्हणाले की, लुक्झेंबर्गमधून भारतात कोल्ड स्टोरेजचं तंत्रज्ञान आणण्यासाठी तसेच निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी मी भारत दौऱ्यावर आहे. गुजरातमध्ये या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आम्ही जागेची पाहणी करणार आहोत. आम्ही भारतामध्ये कोल्ड स्टोरेज साखळी तयार करणार असून 2021 पासून या प्रकल्पाला सुरवात करणार आहोत. यासाठी महाराष्ट्र तसेच तेलंगणा ही राज्ये आमच्या संपर्कात आहेत असे कंपनीचे डेप्यूटी सीईओ जे. दोशी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 64 Heads of Missions in India arrive in Hyderabad scheduled to visit Bharat Biotech and Biological E Ltd