esakal | महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये अद्याप ७५ लाख डोस उपलब्ध

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine
महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये अद्याप ७५ लाख डोस उपलब्ध
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - महाराष्ट्रासह (Maharashtra) विविध राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा (Corona Vaccine) पुरवठा होत नसल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ वैद्यकीय व्यवस्थेवर आली आहे. केंद्र सरकार (Central Government) मात्र राज्यांकडे अजूनही ७५ लाख डोस (Dose) उपलब्ध असल्याचा दावा करीत आहे. सरकारकडून दावे केले जात असले, तरी केंद्रावर आलेल्या नागरिकांना लसीकरणाशिवाय (Vaccination) परतावे लागत असल्याचे चित्र राज्यांमध्ये आहे. (75 lakh doses are still available in various states including Maharashtra)

देशात कोरोनामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यात सुरक्षा उपाय म्हणून लोक लस घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. दुसरीकडे कोव्हिशिल्ड आहे, तर कोव्हॅक्सिन नाही आणि कुठे कोव्हॅक्सिन आहे, तर कोव्हिशिल्ड नाही, अशी स्थिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे लशीचे ७५ लाख डोस असल्याचे आकडे जाहीर केले आहेत. लसीकरण केंद्रावर गर्दी असताना वैद्यकीय यंत्रणेकडून लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य मंत्रालयाकडून, देशभरात १६ कोटी ७० लाख डोस दिसल्याचे सांगितले जात आहे. पुढील तीन दिवसांत ४८ लाख आणखी डोस देण्याची ग्वाही देखील दिली जात आहे. प्रत्यक्षात मात्र लसींअभावी अनेक राज्यात लसीकरण ठप्प आहे.

हेही वाचा: परदेशातून येणारी मदत राज्यांना वेळेत मिळेना!

ओडिशा सरकारने लसीच्या कमतरतेमुळे लसीकरणाची पद्धत बदलली आहे. तसे पत्र राज्य सरकारने जारी केले आहे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर इतर नागरिकांना पहिला डोस दिला जात आहे.

महाराष्ट्रात पुणे-मुंबईतही पुरेशा लसींअभावी लसीकरणाची गती संथ झाली आहे. लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी कशी रोखायची हा प्रश्‍न आता तेथील प्रशासनासमोर आहे.

तिसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू

देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची मोहीम १ मेपासून सुरू झाली आहे. नवीन पात्र लोकसंख्या गटांची नोंदणी २८ एप्रिलपासून सुरू झाली आहे. संभाव्य लाभार्थी थेट कोव्हिन पोर्टलवर (cowin.gov.in) किंवा आरोग्यसेतू ॲपद्वारे नोंदणी करू शकतात, असे आवाहन केंद्र सरकार करत आहेत. परंतु प्रत्येक राज्याला पुरेसा लस पुरवठा कधी होणार, तसेच खासगी कंपन्यांकडून राज्यांना लशी मिळण्याची प्रक्रियेबद्दल आरोग्य मंत्रालयाने अद्याप स्पष्ट आदेश जारी केलेले नाहीत.

हेही वाचा: आंध्र प्रदेशात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन; १५ पट अधिक आक्रमक असल्याचा दावा

रेमडेसिव्हिरची मागणी लवकरच पूर्ण - मांडवीय

रेमडिसिव्हिरचे उत्पादन तिपटीने वाढले असले, तरी प्रत्यक्षात रुग्णालयांमध्ये त्याचा तुटवडा आहे. या इंजेक्शनच्या वितरणावर सरकारी नियंत्रण आले आहे. मात्र, नागरिकांना त्याची जादा भावात खरेदी करावी लागत आहे. दिल्लीत, तर ही औषधे बंदोबस्तात रुग्णालयांना पोचविण्याची वेळ आली. दरम्यान, रेमडेसिव्हिरची मागणी लवकरच पूर्ण होईल, असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.

आज मांडवीय यांनी रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याबाबत आढावा घेतला. ‘‘या औषधाचे उत्पादन जलदगतीने वाढविले जात असून, रेमडेसिव्हिरचे उत्पादन तिप्पट करण्यात यश मिळविले आहे आणि या औषधाची वाढती मागणी पूर्ण करण्यात लवकरच यश मिळेल. एप्रिलमध्यापर्यंत रेमडेसिव्हिरच्या ३७ लाख कुप्यांचे उत्पादन झाले होते, त्यात तिप्पट वाढ होऊन आता एक कोटी ५ लाख कुप्या उत्पादित केल्या. उत्पादक कंपन्यांची संख्याही २०वरून ५७ झाल्या आहेत,’ असे त्यांनी सांगितले.