
'सहा वर्षात ७.५ लाख भारतीयांनी सोडलं देशाचं नागरिकत्व'
नवी दिल्ली : देशात 2016 पासून सुमारे 7.5 लाख भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व (Indian Citizenship) सोडल्याची माहिती समोर आली आहे. तर, दुसरीकडे याच कालाविधीत 6 हजार परदेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. राज्यसभेत सादर केलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, वैयक्तीय कारणांमुळे अनेकांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. 2017 पासून देश सोडून गेलेले बहुसंख्य भारतीय यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत. (7.5 Lakh Indians Renounced Citizenship Since 2016)
हेही वाचा: Mumbai: पावणे MIDCतील आठ कंपन्यांना भीषण आग; बचावकार्य सुरू
2016 आणि 2021 दरम्यान, एकूण 7,49,765 भारतीयांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. जे 2019 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 1.44 लाख होते. त्यानंतर 2016 मध्ये ही संख्या 1.41 लाख होती. त्यानंतर 2020 मध्ये या संख्येत मोठी घट झाल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय 2017 पासून 6.08 लाख भारतीयांनी परदेशी नागरिकत्वासाठी त्यांचे नागरिकत्व सोडल्याचे संसदेत मांडलेल्या मंत्रालयाच्या डेटामध्ये उघड झाले आहे.
हेही वाचा: Twitter CEO: करार संपल्याशिवाय पराग अग्रवाल यांची बदली होणार नाही
31 भारतीयांनी घेतले पाकिस्तानचे नागरिकत्व
मंत्रालयाच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, किमान 31 भारतीयांनी पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. यामध्ये 2020 मध्ये 7 आणि 2021 मध्ये 24 जणांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 2017 ते 2021 दरम्यान, 2,174 भारतीय नागरिकत्व सोडून चीनमध्ये स्थलांतरीत झाले. याशिवाय, या कालावधीत 94 भारतीय श्रीलंकेत स्थायिक झाले.
5,891 परदेशी नागरिकांना नागरिकत्व
2016 ते 2021 दरम्यान एकूण 5,891 परदेशी लोकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. 2018 ते 2021 दरम्यान पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक गटांकडून किमान 8,244 नागरिकत्व अर्ज प्राप्त झाले. 2018 पासून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील एकूण 3,117 हिंदू, शीख, जैन आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे, असे मंत्रालयाने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेला सांगितले.
Web Title: 75 Lakh Indians Renounced Citizenship Since 2016 Says Govt Data
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..