Beti Padhao : ७८ टक्के ग्रामीण पालकांचीही मुलींना पदवीधर करण्याची आकांक्षा

देशातील मुलींच्या शिक्षणाचे चित्र पूर्वीच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात बदलत आहे. आता ग्रामीण भागातील पालकही आपल्या मुलींना शिकविण्यासाठी इच्छुक आहेत.
Student
Studentsakal

नवी दिल्ली - देशातील मुलींच्या शिक्षणाचे चित्र पूर्वीच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात बदलत आहे. आता ग्रामीण भागातील पालकही आपल्या मुलींना शिकविण्यासाठी इच्छुक आहेत. ग्रामीण भागातील सुमारे ७८ टक्के पालकांची मुलींना पदवीधर करण्याची किंवा त्याही पुढे शिकविण्याची इच्छा असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

‘ग्रामीण भारतातील प्राथमिक शिक्षणाची स्थिती-२०२२’ या अहवालाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

ट्रान्सफॉर्मिंग रुरल इंडिया फाउंडेशन (टीआरआयएफ) आणि संबोधी प्रा.च्या पुढाकारातून डेव्हलपमेंट इंटेलिजन्स युनिट (डीआएयू)ने ग्रामीण भागांत हे सर्वेक्षण केले. ग्रामीण विकासाशी संबंधित घटकांना कृतीला चालना देण्यासाठी योग्य विश्लेषण व अंतर्दृष्टीसह माहिती सादर करण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्वेक्षण करण्यात आले.

मुलांइतकेच मुलींनाही तांत्रिक शिक्षण, पदवी किंवा पदव्युत्तर पदवीसह इतर शिक्षण देण्याकडे ग्रामीण भागातील पालकांचा कल आहे. ग्रामीण भागातील ८१ टक्के पालकांची मुलांना तर ७८ टक्के पालकांची मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देण्याची इच्छा आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

शिक्षण सोडलेल्या एकूण मुलांपैकी एक चतुर्थांश मुले आपले शिक्षण प्राथमिक टप्प्यावरच सोडतात. तुलनेने या टप्प्यावर शाळा सोडण्याचे मुलींचे प्रमाण अधिक असून ते ३५ टक्के आहे. तुलनेने प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागांतील सुमारे ७५ टक्के मुले आणि ६५ टक्के मुली शाळा सोडून देतात.

आपल्या गावात किंवा नजीकच्या गावामध्ये प्राथमिक शिक्षणानंतर पुढील माध्यमिक शिक्षणासाठी शाळाच उपलब्ध नसल्यामुळे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागांतील मुलेमुली शिक्षणाला प्राथमिक टप्प्यानंतरच रामराम ठोकत असावीत, असेही अहवालात म्हटले आहे.

मुले स्मार्टफोनवर किती वेळ घालवतात, याचेही सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी, जवळपास ७३ टक्के मुले दररोज दोन तासांपेक्षा कमी वेळ स्मार्टफोन वापरत असल्याचे निदर्शनास आले. मोठी मुले छोट्यांपेक्षा स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवतात. पहिली ते तिसरीतील १६.८ टक्के मुले दररोज दोन ते तीन तास स्मार्टफोन वापरतात. इयत्ता आठवी किंवा त्यापुढील इयत्तांतील २५ टक्के मुले दररोज दोन ते चार तास स्मार्टफोन वापरत असल्याचे आढळले.

कसे केले सर्वेक्षण?

राज्ये : २०

एकूण कुटुंबे : ६,२२९

प्रमुख निष्कर्ष

  • आईच्या मार्गदर्शनात अभ्यास करणारी मुले - ६२.५ टक्के

  • वडिलांच्या मार्गदर्शनात अभ्यास करणारी मुले - ४९ टक्के

  • भाऊ-बहिणीच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणारे - २५.६ टक्के

  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून शिकणारी - ३.८ टक्के

  • मुलांना खासगी शिकवणी लावणारे पालक - ३८ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com