कोलकात्यामधील ९० रुग्ण ते भंडाऱ्यातील दहा बालकांचे मृत्यूतांडव; वाचा देशाला हादरविणाऱ्या आगीच्या घटना

टीम ई सकाळ
Saturday, 9 January 2021

17 बालकांपैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र, रुग्णालयात आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत.

नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजण्याच्या दरम्यान 2 वाजता ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र, रुग्णालयात आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत.  देशातील रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनांचा आढावा घेऊयात.

हेही वाचा - VIDEO : आई-बाप झालो म्हणून गगनात मावत नव्हता आनंद, पण...

देशातील रुग्णालयात लागेल्या आगीच्या घटना -

  1. गेल्या डिसेंबर २०१८ मध्ये मुंबईच्या शासकीय कामगार रुग्णालयात आग लागली होती. यामध्ये ८ जणांचा आगीत होरपोळून मृत्यू झाला होता, १७६ जण गंभीर जखमी झाले होते. 
  2. गेल्या ऑक्टोबर २०१८ मध्ये कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डिस्पेंसरीमध्ये आग लागली होती. जवळपास २५० जणांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले होते. याठिकाणी आपत्ती निवारणाची सोय नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असल्याचे नंतर अहवालामधून समोर आले होते.
  3. गेल्या ऑक्टोबर २०१६ मध्ये भुवनेश्वर येथील सम रुग्णालयात भीषण आग लागली होती. यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अनेकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. तसेच काही रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवले होते. त्यांचाही मृत्यू झाला होता. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षा कर्मचार्‍यांनी रुग्णांना रुग्णालयाच्या बाहेर पळण्यापासून रोखले होते. त्यांनी प्रोटोकॉलचा हवाला देत त्यांना जळत्या इमारतीत परत ढकलले. कारण त्यांना वरून रुग्णांना सोडण्याचे आदेश आले नव्हते.
  4. गेल्या ऑक्टोबर २०१६ मध्ये पश्चिम बंगालमधील मुरुशिदाबाद वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात भीषण आग लागली होती. यामध्ये दोघांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले होते. 
  5. गेल्या नोव्हेंबर २०१५ मध्ये कट्टक येथील शिशू भवन रुग्णालयात आग लागली होती. यामध्ये ११ लाखांच्या यंत्रांचे नुकसान झाले होते, तर एक चिमुकला गंभीर जखमी झाला होता. यापूर्वी याच रुग्णालयात काही अर्भकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हे रुग्णालय चर्चेत होते. 
  6. तमिळनाडू येथील ऐरवडी गावातील मनोरुग्णालयात ६ ऑगस्ट २००१ मध्ये आग लागली होती. यामध्ये खाटांना साखळी बांधून ठेवलेल्या २८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. श्रद्धमुळे त्यांच्या अनोख्या पद्धतीने उपचार करत असल्याचा दावा या मनोरुग्णलयाकडून करण्यात आला होता. 
  7. गेल्या २०१३ मध्ये बिकानेर येथील पीबीएम रुग्णालयात आग लागली होती. यामध्ये काही अर्भक जखमी झाले होते, संपत्तीचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले होते. 
  8. कोलकाता येथील एएमआरआय रुग्णालयातील आगीची घटनेचा आजही उल्लेख झाला, तर अंगावर काटा उभा राहतो. यामध्ये ९४ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ९० रुग्णांचा समावेश होता. पार्कींगमधील कारमध्ये कोणीतरी अवैधरित्या साठवलेले ज्वलनशील पदार्थाला आग लागली. ती आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने रुग्णांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - ‘तुम्हीच सांगा काय चूक होती आमची? आईला बघण्याआधीच कायमचे मिटावे लागले डोळे

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 hospital fire incident in india bhandara fire incident live updates