वयाच्या आठव्या वर्षी तिसरीत नव्हे तर थेट नववीत प्रवेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

एक आठ वर्षाच्या मुलाने बुद्धिमत्तेच्या जोरावर थेट नववीच्या वर्गात प्रवेश मिळवला आहे.

लखनौ : वयाच्या आठव्या वर्षी मुलगा कितव्या इयत्तेत असेल तर तिसऱया म्हणून कोणीही उत्तर देईल. पण, येथील एक आठ वर्षाच्या मुलाने बुद्धिमत्तेच्या जोरावर थेट नववीच्या वर्गात प्रवेश मिळवला आहे. राष्ट्रम आदित्य श्रीकृष्णा असे या अफाट बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

प्राथमिक शिक्षण घरी घेतल्यानंतर राष्ट्रम आदित्य श्रीकृष्णा पालकांनी त्याला दहावीत प्रवेश देण्यासाठी अर्ज केला होता. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा] मात्र, त्याची अफाट बुद्धिमत्ता पाहून उत्तर प्रदेश शिक्षण विभागाने त्याला दहावीऐवजी नववीत प्रवेश देण्यास होकार दिला आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी इतर विद्यार्थी ज्या इयत्तेत शिकतात, तिथे पाच-सहा वर्ष आधीच प्रवेश करण्याची किमया राष्ट्रम आदित्य श्रीकृष्णाने साधली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रम वयाची नऊ वर्ष पूर्ण करेल. राष्ट्रमला इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेताना अडथळा होता तो वय आणि आधीच्या इयत्तांचा अभ्यास न केल्याचा. मात्र, राष्ट्रम आता लखनौमधील नख्सासमध्ये असलेल्या एमडी शुक्ला इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेणार आहे.

राष्ट्रम हा रायबरेली येथील पवन कुमार आचार्य यांचा मुलगा. त्याचे प्राथमिक शिक्षण कोणत्याही शाळेत झालेले नसून, घरीच झाले आहे. 'होम स्कूलिंग' या संकल्पनेविषयी आता बऱ्याचशा पालकांना माहिती आहे. आपल्या मुलाचे शिक्षण अशाप्रकारे झाले आहे, की तो थेट हायस्कूल परीक्षा देऊ शकेल, असा विश्वास त्याच्या वडिलांना वाटत आहे. पवन आचार्य आणि त्यांच्या पत्नीने राष्ट्रमला घरीच शिक्षण दिले आहे. गणित आणि सामाजिक शास्त्रांमध्ये त्याने उत्तम ज्ञान संपादन केले आहे. शिवाय, योग विषयात राष्ट्रमला रुची आहे. हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषा त्याने वयाच्या आठव्या वर्षात काही प्रमाणात अवगत केल्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तींना जमणार नाहीत, अशा प्रश्नांची उत्तरं राष्ट्रम क्षणात देतो, असा दावाही त्याच्या वडिलांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 Year Old Kid Got Direct Admission Into Class 9 at uttar pradesh