दिल्लीत ८० टक्के आयसीयू बेड राखीव; कोरोनाग्रस्तांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 13 September 2020

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असताना रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची देखील कमतरता भासू लागली आहे.

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असताना रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची देखील कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राज्यातील ३३ बड्या रुग्णालयांना ८० टक्के आयसीयू बेड कोरोना रुग्णांसाठी राखून ठेवण्याचे निर्देश दिले आहे. दिल्लीत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून शनिवारी एकाच दिवसामध्ये ४ हजार ३२१ रुग्णांची त्यामध्ये भर पडली आहे. आता एकूण बाधितांची संख्या ही २ लाख १४ हजारांवर गेली आहे.

दरम्यान दिल्लीमध्ये एकाच दिवशी चार हजार रुग्ण सापडण्याची ही चौथी वेळ आहे.राजधानी क्षेत्रामध्ये अनेक रुग्णालये ही त्यांच्याकडील आयसीयू बेड हे जाणीवपूर्वक रुग्णांना उपलब्ध करून देत नसल्याचे उघड झाले होते.आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी याच मुद्यावरून मध्यंतरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रुग्णालयांच्या व्यवस्थापनाशी संवाद देखील साधला होता.

जागतिक शांततेला अमेरिकेचाच धोका; भांडखोर चीनची टीका

राज्य आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या रुग्णालयांमध्ये सध्या पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गरज पडल्यास रुग्णालयांना आम्ही त्यांच्या बेडची संख्या ३० टक्क्यांनी वाढविण्याचे निर्देश दिले आहेत, सध्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक बेड हे रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहेत. दिल्ली सरकारने तयार केलेल्या कोरोना अॅपवर याची माहिती उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मास्कद्वारे संसर्ग टाळणे शक्य

भविष्यामध्ये राज्यात लॉकडाउन लावण्याची शक्यता फेटाळून लावतानाच ते म्हणाले की,'' आम्ही यातून बरेच काही शिकलो आहोत, मास्क धारण करून आपण या संसर्गाचा अधिक प्रभावीपणे मुकाबला करू शकतो. आता पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ निघून गेली आहे. राज्यातील कोरोना चाचण्यांमध्येही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या साठ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 80 percent ICU beds reserved in Delhi A big decision of the state government for the corona victims