काश्‍मीर: गोरक्षकांच्या हल्ल्यात 9 वर्षांच्या मुलीसह 5 जखमी 

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

या हल्ल्यात जखमी झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा 'एफआयआर' दाखल केला आहे. या हल्लेखोरांपैकी पाच जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.

श्रीनगर : कथित गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये जम्मू-काश्‍मीरमध्ये पाच जणांचे कुटुंब जखमी झाले आहे. यामध्ये एका नऊ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. 'एनडीटीव्ही'ने दिलेल्या बातमीनुसार, काल (शुक्रवार) सायंकाळी ही घटना घडली. 

जम्मू-काश्‍मीरमधील रिसी जिल्ह्यात हा हल्ला झाला. हे कुटुंब उपजीविकेची साधने घेऊन प्रवासास निघाले होते. त्यांना कथित गोरक्षकांनी अडविले आणि लोखंडी सळईने मारहाण केली. या हल्लेखोरांनी त्या कुटुंबाकडील शेळ्या-मेंढ्या आणि गाई पळवून नेल्या. या हल्ल्यात जखमी झालेल्या नऊ वर्षांच्या मुलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा 'एफआयआर' दाखल केला आहे. या हल्लेखोरांपैकी पाच जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. 

या कुटुंबातील सदस्य नसीम बेगम म्हणाल्या, "त्यांनी आम्हाला बेदम मारहाण केली. त्यांनी आमच्या कुटुंबातील वृद्धांनाही सोडले नाही. तिथून कसेतरी आम्ही निसटलो. पण आमच्या कुटुंबातील दहा वर्षांचा एक मुलगा बेपत्ता झाला आहे. तो जिवंत आहे की नाही, हेदेखील आम्हाला माहीत नाही. त्यांना आमचा जीवच घ्यायचा होता.'' 

Web Title: 9 Year Old Girl Attacked By Cow Vigilantes In Jammu And Kashmir