
UIDAI ने रद्द केले 6 लाख नागरिकांचे आधार कार्ड, जाणून घ्या कारण
Duplicate Adhar Card : आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक कागदपत्रांपैकी एक असून, कोणत्याही प्रकारच्या सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी हे अनिवार्य कागदपत्रांपैकी एक आहे. मात्र, डुप्लिकेट आधार किंवा बनावट आधार कार्डशी संबंधित अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ही बाब लक्षात घेता UIDAI ने बनावट आणि डुप्लिकेट आधार कार्डची ओळख पटवून ते रद्द करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईअंतर्गत UIDAI ने आतापर्यंत 598,999 पेक्षा जास्त डुप्लिकेट आधार कार्ड रद्द केले आहेत असे वृत्त HT Tech ने दिले आहे.
लवकरच होणार चेहऱ्यावरून आधार पडताळणी
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत डुप्लिकेट आधार कार्ड रद्द केल्याची माहिती दिली. UIDAI ने डुप्लिकेट आधारच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तसेच आधारकार्डमध्ये एक अतिरिक्त पडताळणी फिचर जोडण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच आधार पडताळणीसाठी चेहऱ्यावरून व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. सध्या व्हेरिफीकेशनसाठी फक्त फिंगरप्रिंट आणि बुबुळाच्या मदत घेतली जात आहे.
आधारशी संबंधित सेवा देणार्या बेकायदेशीर वेबसाइट्सवरील दुसर्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रशेखर म्हणाले की, UIDAI ने या वेबसाइट्सना नोटिसाही पाठवल्या आहेत. तसेच संबंधित वेबसाइट्सच्या मालकांना अशा प्रकारच्या अनधिकृत सेवा देणे बंद करण्यास सांगितले आहे. तसेच सेवा प्रदात्यांनादेखील अवैध वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले आहे.
11 बनावट आधार तयार करणाऱ्या कंपन्या बॅन
जानेवारी 2022 पासून बनावट आधार कार्डची निर्मिती करणाऱ्या 11 कंपन्या बॅन करण्यात आल्या आहेत. त्यानुासर या वेबसाइट्सना रहिवासासंबंधी नावनोंदणी करण्याचे आणि बायोमेट्रिक माहितीमध्ये बदल करण्याचे किंवा मोबाइल नंबर सध्याच्या आधारशी लिंक करण्याचे अधिकार देण्यात आलेले नाही. त्यामुळे मोबाईल नंबर पत्ता आणि फोटोपर्यंत सर्व तपशील अपडेट करण्यासाठी नागरिकांनी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट तसेच अधिकृत आधार केंद्रांना भेट द्यावी असे आवाहन राजीव चंद्रशेखर यांनी नागरिकांना केले आहे.