खासदार संजय सिंहांसह 'आप'च्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; CBI कार्यालयाबाहेर मोठी गर्दी I CBI Office | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aam Aadmi Party

सीबीआय कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी काही वेळ इथं ध्यान साधना केली.

CBI Office : खासदार संजय सिंहांसह 'आप'च्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; CBI कार्यालयाबाहेर मोठी गर्दी

नवी दिल्ली : सीबीआय कार्यालयाबाहेर (CBI Office) निदर्शनं करणारे आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आलंय. दारू धोरण प्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आज सीबीआयसमोर हजर झाले आहेत.

यादरम्यान सीबीआय कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली आहे, त्यामुळं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सीबीआय मनीष सिसोदिया यांना अटक करेल, अशी भीती 'आप'ला आहे.

सीबीआय कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी काही वेळ इथं ध्यान साधना केली. यावेळी त्यांच्यासोबत आपचे राज्यसभा खासदार संजय सिंहही उपस्थित होते. सीबीआय मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांची चौकशी करत आहे. सकाळी 11 च्या सुमारास सिसोदिया सीबीआय कार्यालयात हजर झाले. मनीष सिसोदिया यांच्या घराबाहेर सकाळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी ट्विट केलं की, "आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचं प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल. पण, तुम्ही काळजी करू नका. मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळं तुरुंगात जाणं ही छोटी गोष्ट आहे. "