दिल्लीत आम आदमी पक्षाला धक्का; महिला आमदार म्हणाली ‘गुड बाय’

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आम आदमी पक्षात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मतभेदांना आज, अखेर पूर्णविराम मिळाला. पक्षाच्या आमदार आणि दिल्लीती प्रभावी नेत्या अलका लांबा यांनी पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी सोशल मीडियावरून याची घोषणा केली आहे. सध्या अलका लांबा पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आम आदमी पक्षात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मतभेदांना आज, अखेर पूर्णविराम मिळाला. पक्षाच्या आमदार आणि दिल्लीती प्रभावी नेत्या अलका लांबा यांनी पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी सोशल मीडियावरून याची घोषणा केली आहे. सध्या अलका लांबा पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

इंदापूरचं राजकारण तापलं; सुप्रिया सुळेंचे हर्षवर्धन पाटील यांना आव्हान (व्हिडिओ)

अलका लांबा या आम आदमी पक्षाच्या चांदणी चौकच्या आमदार आहेत. त्यांनी आज, ट्विट करून पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. ट्विटमध्ये लांबा यांनी म्हटले आहे की, आप आता गुड बाय करण्याची वेळ आली आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही मी राजीनामा देत आहे. गेल्या सहा वर्षांतील अनुभव खूपच चांगला होता. मला खूप काही शिकायला मिळाले. मुळात अलका लांबा यांचा राजीनामा हा आश्चर्याचा विषय नाही. कारण, गेल्या अनेक महिन्यांपासून आम आदमी पक्ष आणि अलका लांबा यांच्यात मतभेद सुरू होते. अनेकदा हे मतभेद चव्हाट्यावरही आले होते. लांबा यांनी आपण, आगामी निवडणूक पक्षाकडून नाही तर, अपक्ष लढवणार असल्याचेही जाहीर केले होते.

कोण आहेत अलका लांबा?
दिल्ली विद्यापीठातील स्टुडंट्स युनियनमधून अलका लांबा हे नेतृत्व उदयाला आले. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. युवा नेतृत्व म्हणून प्रभावी कामगिरी केल्यानंतर त्यांना दिल्ली प्रदेश काँग्रेसचे दरवाजे खुले झाले. पुढे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीतही त्यांची वर्णी लागली. या कमिटीच्या सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले. एकेकाळी राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू नेत्या म्हणून त्यांची ओळख झाली होती. पण, तिकिटा वाटपातील नाराजीनंतर त्यांनी काँग्रेसला राम राम करून २०१३मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्या चांदणी चौक या लक्षवेधी मतदारसंघातून निवडूनही आल्या होत्या. पण, आपमध्ये त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही. दिल्लीच्या राजकारणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे दोनच नेते सध्या दिसत आहे. त्यात लांबा झाकोळल्या गेल्या. पक्षातील मतभेदांमुळे त्यांना आम आदमी पक्षाच्या ऑफिशिअल व्हॉट्सअप ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा प्रचार करण्यास लांबा यांनी नकार दिला होता. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या एका रोड शोमध्ये त्यांना कारच्या मागून चालत येण्यास सांगण्यात आले होते. त्याला आक्षेप घेत त्या रोड-शोमधूनच बाहेर पडल्या होत्या.

कोल्हापुरात मधुरिमाराजेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे प्रयत्न

पुन्हा स्वगृही?
काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू केल्या लांबा पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षा संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, आम आदमी पक्षात नाराज असलेल्या. लांबा यांना पुन्हा पक्षात घेण्याचे प्रयत्न झाले. त्यात काँग्रेसला यश आल्याचे मानले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aap mla alka lamba finally resigns from party may join congress sonia gandhi