अमानतुल्ला खान यांची 'आप'मधून हकालपट्टी

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

यदि अंधकार से लडने का संकल्प कोई कर लेता है। 
तो अकेला जुगनू भी अंधकार हर लेता है। 
लडेंगे! जीतेंगे! आभार! 
भारत माता की जय 
- कुमार विश्‍वास, "आप' नेते 

नवी दिल्ली - दिल्लीतील सत्तारूढ आम आदमी पक्षात (आप) गेले काही दिवस चाललेल्या पक्षांतर्गत संघर्षावर उतारा म्हणून पक्षातील नाराज नेते कुमार विश्‍वास यांना राजस्थानचे प्रभारीपद देण्यात आले आहे. त्यांच्यावर भाजप संघाचे हस्तक असल्याचा वारंवार आरोप करणारे आमदार अमानतुल्ला खान यांना पक्षातून निलंबित केले गेले आहे.

पक्षाच्या राजकीय मुद्द्यांच्या समितीच्या म्हणजे "पीएसी'च्या तीन तासांच्या बैठकीनंतर "आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, कुमार विश्‍वास आदींनी एकत्रित छायाचित्र काढून पक्षातील तणाव निवळल्याचे संकेत दिले. 

केजरीवाल व सिसोदिया यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेले कुमार विश्‍वास यांनी खान यांच्या आरोपांनंतर बंडाची भाषा केली होती. त्यांची समजूत काढण्यासाठी केजरीवाल व सिसोदिया काल रात्री त्यांच्या घरीही गेले होते. मात्र ते तेथून दहा मिनिटांत बाहेरही पडले होते. त्यानंतर आजच्या "पीएसी'च्या बैठकीत सहभागी होण्यास विश्‍वास यांनी होकार दिला होता. आज साडेतीन तास चाललेल्या या बैठकीनंतर अमानतुल्ला खान यांना निलंबित केले गेले. मात्र विश्‍वास यांनी त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केजरीवाल यांनी मान्य केली नाही. या पार्श्वभूमीवर विश्‍वास यांचा पक्षावरील "विश्‍वास' खरोखरच परतला आहे का, याबद्दल शंका व्यक्त होत आहे. त्यांनी आजही, आपल्याला मुख्यमंत्री वा पक्षाध्यक्ष व्हायचे नाही, याचा पुनरुच्चार केला. 

बैठकीनंतर सिसोदिया व विश्‍वास पत्रकारांसमोर आले. सिसोदिया यांनी सांगितले, की आजच्या बैठकीनंतर गैरसमज दूर झाले आहेत. विश्‍वास यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी देण्यात आली असून, तेथे ते पक्षाची रणनीती ठरवतील. जरूर पडेल तेव्हा पक्षात विचारविनिमयाची प्रक्रिया सुरू राहील. अमानतुल्ला खान यांना निलंबित केले गेले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी पंकज गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. विश्‍वास यांनी पक्षनेतृत्वासमोर ठेवलेल्या पुढील तीन अटी मान्य करण्यात आल्या आहेत. नेतृत्वाने कार्यकर्त्यांशी संवाद साधावा, भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कठोर कारवाई व्हावी व आपण "वुई द नेशन' या व्हिडिओबद्दल कोणाचीही माफी मागणार नाही, अशा या अटी आहेत. 

यदि अंधकार से लडने का संकल्प कोई कर लेता है। 
तो अकेला जुगनू भी अंधकार हर लेता है। 
लडेंगे! जीतेंगे! आभार! 
भारत माता की जय 
- कुमार विश्‍वास, "आप' नेते 

Web Title: AAP suspends MLA Amanatullah Khan