'ते तुला पण मारून टाकतील', हे सोनियांचे शब्द अखेर ठरले खरे

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

'ते तुलाही मारून टाकतील' राजीव सोनियांना सांगत होते की, 'पक्षाची इच्छा आहे की, मी पंतप्रधानपदाची शपथ घ्यावी.' सोनियांनी तत्काळ 'अजिबात नाही', असं सांगितलं होते. 'ते तुला पण मारून टाकतील...' हे सोनियांचे शब्द होते.
यावर राजीव यांचे उत्तर होते, 'माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मी तसाही मारला जाणार आहे.' सात वर्षांनंतर ते शब्द अखेर खरे ठरले होते.

नवी दिल्ली : 10, जनपथ या राजीव गांधींच्या निवासस्थानी त्यांचे खाजगी सचिव व्हिन्सेंट जॉर्ज यांना चेन्नईहून आलेला 'तो' फोन उचलला. त्यानंतर, त्यांनी जे काही ऐकलं, ते सोनिया गांधींना सांगण्याचा त्यांना धीरच झाला नाही. जॉर्ज यांच्या तोंडून अजिबात आवाज फुटत नव्हता. तरी, सगळा धीर एकवटत जॉर्ज घाबरलेल्या आवाजात म्हणाले, मॅडम चेन्नईमध्ये एक मोठा बाँबस्फोट झाला आहे. सोनियांनी जॉर्ज यांच्या डोळ्यांत बघत पटकन विचारलं, "इज ही अलाइव्ह?" मात्र, जॉर्ज गप्प राहिले. जॉर्ज यांच्या गप्प बसण्यातून सोनियांना सारं काही कळलं यानंतर सोनियांच्या आक्रोशानं 10 जनपथ हळहळलं. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजीव यांच्या आठवणीत हे भयानक क्षण अभिषेक देशपांडे यांनी फेसबुक पोस्ट करून सर्वांसमोर आणले आहेत.

इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलेल्या पी. सी. अलेक्झांडर यांनी आपलं पुस्तक 'माय डेज विथ इंदिरा गांधी' यात एक अनुभव लिहिला आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काही तासांतच त्यांनी एम्सच्या इमारतीत सोनिया आणि राजीव यांना भांडताना पाहिलं होते.

'ते तुलाही मारून टाकतील' राजीव सोनियांना सांगत होते की, 'पक्षाची इच्छा आहे की, मी पंतप्रधानपदाची शपथ घ्यावी.' सोनियांनी तत्काळ 'अजिबात नाही', असं सांगितलं होते. 'ते तुला पण मारून टाकतील...' हे सोनियांचे शब्द होते.
यावर राजीव यांचे उत्तर होते, 'माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. मी तसाही मारला जाणार आहे.' सात वर्षांनंतर ते शब्द अखेर खरे ठरले होते.

अभिषेक देशपांडे यांनी लिहिले आहे, की 21 मे 1991 च्या रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये असंच काहीसं घडलं. जे घडलं ते भीषण होतं. 30 वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली. ती मुलगी राजीव यांच्या पाया पडण्यासाठी वाकली आणि.... आसमंत हादरला, कानठळ्या बसणारा एक स्फोट झाला. त्यावेळी व्यासपीठावर राजीव यांच्या सन्मानासाठी एक गाणं गायलं जात होतं... त्याचा अनुवाद काहीसा असा होता - 'राजीव यांचं जीवन आमचं जीवन आहे... जर हे जीवन इंदिरा गांधी यांच्या मुलाला समर्पित नाही केलं, तर मग, हे जीवन मिथ्या आहे....'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhishek Deshpande facebook post about former PM Rajiv Gandhi death