आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे- वैद्य

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

बिहार निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 21 सप्टेंबर 2015 ला संघाचे सरसंघचालक यांनी आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचा भाजपला बिहारमध्ये मोठा फटका बसला होता. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. 

जयपूर - "आरक्षणाच्या नावाखाली दलित व ओबीसींना अनेक वर्षे इतरांपासून एकटे पाडले गेले,'' असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मनमोहन वैद्य यांनी केले.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला आमंत्रण मिळाले आहे. या विधानावरून बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी संघ व केंद्र सरकारवर तत्काळ टीका करण्यास सुरवात केली आहे. 

"आरक्षणाच्या नावाखाली शेकडो वर्षे लोकांना वेगळे ठेवले गेले. आरक्षणामुळे फुटीरतावाद वाढू शकतो, त्यामुळे एका ठराविक वेळेनंतर जातीवर आधारित आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे,'' असे मनमोहन वैद्य म्हणाले. 
ते म्हणाले, ""सर्वांना समान अधिकार आणि समान शिक्षण मिळाले पाहिजे, त्यामुळे एका विशिष्ट वेळेपर्यंत आरक्षण हद्दपार केले पाहिजे. डॉ. बाबासाहेब हे कायम आरक्षणाच्या बाजूने नव्हते. कायम आरक्षणाला त्यांचा विरोध होता.'' 

वैद्य यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. समाजवादी पक्षाचे नेते गौरव भाटिया म्हणाले, "उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मतांच्या ध्रुवीकरणासाठी वातावरण निर्माण करण्यासाठी ठरवून हे विधान करण्यात आले आहे. काही संस्था व लोकांना सत्ता पाहिजे आहे; पण जबाबदारी नको आहे असे यावरून स्पष्ट होते. वैद्य यांच्या विधानावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.'' 

बसपचे नेते एम. एच. खान म्हणाले, "या विधानांवरून रा. स्व. संघ व भाजपचा अल्पसंख्याकांना असलेला विरोध दिसतो.'' 

बिहार निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 21 सप्टेंबर 2015 ला संघाचे सरसंघचालक यांनी आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचा भाजपला बिहारमध्ये मोठा फटका बसला होता. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा उचल खाल्ली आहे. 

Web Title: Abolish reservations, says Manmohan Vaidya at Jaipur Literary Festival