esakal | #Positive Story - भीक मागणं सोडून दिव्यांग महिलेनं सुरू केला फळविक्रीचा व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

fruit

 दोन वर्षांपूर्वी रमा देवींच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तीन मुलं असलेल्या रमा देवींना कोणाचाच आधार नव्हता. उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न समोर उभा ठाकलेल्या रमा देवींनी भीक मागायला सुरुवात केली. 

#Positive Story - भीक मागणं सोडून दिव्यांग महिलेनं सुरू केला फळविक्रीचा व्यवसाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद - दोन वर्षे रस्त्यावर भीक मागितल्यानंतर दिव्यांग असलेल्या महिलेनं फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी काही सामजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. लहानपणी पोलिओमुळे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तेलंगणातील रमा देवी हिच्या आयुष्याची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. रमा म्हणते, पोलिओ झाला आणि पायांची हालचाल थांबली. त्यामुळे काहीच करता येणं शक्य नव्हतं. 

शिक्षणाबद्दल सांगताना रमा देवींनी म्हटलं की, 'माझं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. दहावी पर्यंत शिकल्यानंतर तेलंगणातील ज्युनिअर कॉलेजमध्ये पुढे शिक्षण घेतलं.' आई वडील कोण हे माहिती नाही. लहान असतानाच एका कुटुंबाने तिला दत्तक घेतलं. हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचं लग्न लावून देण्यात आलं आणि ती हैदराबादला आली.

वैवाहिक आयुष्य आनंदात जात असताना दोन वर्षांपूर्वी रमा देवींच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तीन मुलं असलेल्या रमा देवींना कोणाचाच आधार नव्हता. उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न समोर उभा ठाकलेल्या रमा देवींनी भीक मागायला सुरुवात केली. जवळपास दोन वर्षे त्यांनी हैदराबादच्या रस्त्यांवर भीक मागितली. 

हे वाचा - संशोधनासाठी युरोपला चला; आयसीएसएसआर, युरोपीय महासंघात करार

रमा देवींच्या तीन अपत्यांपैकी दोन मुलांना त्यांनी जन्म दिला. तर मुलगी दत्तक घेतली होती. दोन वर्षे भीक मागितली आणि त्यावेळी दुसऱीकडे मुलांना शाळेत पाठवलं. त्यांचं शिक्षण सुरू होतं. 

पतीचं निधन झालेलं, पदरी तीन मुलं, त्यांचं शिक्षण, कुटुंबाचा खर्च यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्यावर भीक मागत असताना पायातून आणि हातातून रक्त वाहत होतं. तेव्हा त्यांच्या वेदना पाहून काही लोकांनी मिळून रमा देवींना व्हीलचेअर दिली. 

हे वाचा - फक्त 1 रुपयात पोटभर जेवण!

आयुष्यात इतकं नैराश्य आलं होतं की रमा देवींनी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. रमा देवी म्हणतात की,'शेवटी आयुष्य जगण्याचा मार्ग सापडला. इतक्यावेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही देवाने मला जिवंत ठेवलं.' रमा देवींच्या वेदना पाहवत नव्हत्या. आता त्यांचा स्वत:चा फळविक्रीचा व्यवसाय सुरु झाला आहे. त्यांना आनंदी पाहून बरं वाटतं अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.