दिल्ली विद्यापीठात अभाविप विजयी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

मतमोजणी दरम्यान, काही विद्यार्थी संघटनांनी इव्हीएम मशिनवर प्रश्न उपस्थित करून मतमोजणी थांबवली होती. पण, अखेरीस अभाविपचा विजय निश्चित झाला. ही निवडणूक अभाविप, एनएसयुआय, आप छात्र संघर्ष युवा समिती-ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने संयुक्तपणे लढवली होती.  

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनीधींच्या निवडणूकीनंतर काल (ता. 13) निकाल जाहीर झाले. या निवडणूकीत 4 पैकी 3 पदे जिंकत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बाजी मारली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव ही तीन प्रमुख पदे अभाविपने जिंकली. तर काँग्रेसप्रणित एनएसयुआयने सचिवपद जिंकले. अभाविपने तीन जागांवर यश मिळवत विजयाची परंपरा चालू ठेवली.

मतमोजणी दरम्यान, काही विद्यार्थी संघटनांनी इव्हीएम मशिनवर प्रश्न उपस्थित करून मतमोजणी थांबवली होती. पण, अखेरीस अभाविपचा विजय निश्चित झाला. ही निवडणूक अभाविप, एनएसयुआय, आप छात्र संघर्ष युवा समिती-ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने संयुक्तपणे लढवली होती.    

अध्यक्षपदी निवडून आलेल्या अभाविपच्या अंकीव बसोयाला 20, 467, उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या अभाविपच्या शक्ती सिंह 7, 673 मतांनी जिंकले, तर सचिवपदी निवडू आलेल्या एनएसयुआयच्या आकाश चौधरीला 20, 198 मते मिळाली. 

'आम्ही मागील वर्षी केलेल्या कामांमुळे पुन्हा जिंकलो. एनएसयुआयने मागील वर्षात फारसे काम केले नाही, तसेच काही सोयी-सुविधा देण्यातही ते अपयशी ठरले. त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या व विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा सोयी आम्ही दिल्या,' असे मत विजयी अध्यक्ष अंकीव बसोया याने व्यक्त केले.   

निवडणूकी आधी सर्व विद्यार्थी संघटनांनी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी एनएसयूआयने विद्यापीठात 10 रूपयांना जेवण मिळेल असे आश्वासन दिले होते. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यार्थी संघटनेला मिळणाऱ्या अनुदानातून पन्नास टक्के पैसे हे महिला व सामाजिक न्याय तसेच क्रीडा क्षेत्रावर खर्च करण्याचे आश्वासन दिले आहे.

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत अभाविपचे अभिनंदन केले आहे. 

 

Web Title: ABVP wins in delhi university