अपघात की घातपात? भाजप आमदाराविरोधात खुनाचा गुन्हा

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

उन्नाव अत्याचारपीडितेच्या अपघातप्रकरणी सीबीआय चौकशीला सरकार तयार 

उन्नाव/ लखनौ ः उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या गाडीला झालेल्या अपघाताची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यास तयार असल्याचे आज उत्तर प्रदेश सरकारकडून सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातप्रकरणी उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेला भाजपचा आमदार कुलदीपसिंह सेंगर, त्याचा भाऊ मनोजसिंह सेंगर आणि इतर आठ जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित ट्रकचा मालक आणि चालकाला अटक केली आहे. तसेच, ट्रकची नंबरप्लेट जप्त केली आहे. 

या भीषण अपघातात पीडित तरुणीचे दोन नातेवाईक मृत्युमुखी पडले असून, पीडित तरुणी आणि तिचा वकील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नसून, आमचे कुटुंब संपविण्याच्या दृष्टीने नियोजनपूर्वक आखलेला कट असल्याचा आरोप पीडित तरुणीच्या आईने केला आहे. 

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पीडित तरुणीची आत्या आणि मावशीचा समावेश आहे. या दोघीही बलात्कार प्रकरणातील साक्षीदार होत्या. पीडित तरुणी प्रवास करत असलेल्या गाडीला रायबरेलीजवळ रविवारी भरधाव ट्रकने धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेली पीडित तरुणी आणि वकिलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या अपघाताच्या घटनेचे पडसाद थेट संसदेत उमटले. 

समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करत पीडित तरुणीला ठार करण्याचा हा कट होता, असा आरोप केला. पीडित तरुणीला पुरविण्यात आलेला सुरक्षारक्षक अपघात झाला त्या वेळी तिच्यासोबत नव्हता. संबंधित ट्रकची नंबर प्लेटही झाकून टाकण्यात आली होती, असे यादव म्हणाले. 

उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला भाजपचा आमदार कुलदीपसिंह सेंगर याला मागील वर्षी 13 एप्रिल रोजी अटक करण्यात आले असून, तो सध्या तुरुंगात आहे. 

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी लखनौमध्ये जखमी पीडित तरुणीची भेट घेतली. चांगले उपचार मिळावेत म्हणून पीडित तरुणीला हवाईमार्गे दिल्लीला हलविण्याची मागणीही मलिवाल यांनी केली आहे. 

अपघात की घातपात? 
पीडित तरुणीच्या गाडीला झालेल्या अपघातामागे घातपात असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पीडितेच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यास या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याची माहिती पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दिली. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसून येते; मात्र सत्य पुढे येण्यासाठी चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident or Murder? Murder case against BJP MLA in Unnav rape case