पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला!

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जून 2019

विमानाच्या एका इंजिनाला पक्षी धडकल्यानंतर ते बंद पडले होते. त्यामुळे पायलटने तत्काळ विमान उतरविण्याचा निर्णय घेतला.​

अंबाला : भारतीय वायू दलाच्या (आयएएफ) एका विमानाला पक्षी धडकल्याने पायलटला ते विमान आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागले. विमान लॅण्ड करण्यापूर्वी पायलटला विमानाचे इंधन आणि बॉम्ब भर वस्तीत सोडावे लागले. वेळीच प्रसंगावधान दाखविल्यामुळे विमान सुरक्षितस्थळी लॅण्ड झाल्याने मोठा अपघात टळला.

विमानाच्या एका इंजिनाला पक्षी धडकल्यानंतर ते बंद पडले होते. त्यामुळे पायलटने तत्काळ विमान उतरविण्याचा निर्णय घेतला. या घटनेत इतर कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्त हानी झाली नसल्याची माहिती वायू दलाच्या सूत्रांनी दिली. विमान उड्डाणावेळी आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास विमानाच्या पंखाखाली ठेवलेले सर्व सामान सोडण्याचे अधिकार पायलटला असतात. ज्यामध्ये बॉम्ब आणि इंधनाच्या टाक्यांचा समावेश असतो. 

जमिनीपासून उंचीवर गेल्यावर विमान कोसळू नये, तसेच मोठी दुर्घटना घडू नये यासाठी पायलटने इंधन टाकी आणि छोटे बॉम्ब मोकळ्या जागी टाकले होते. ही घटना तेव्हा घडली जेव्हा विमान अंबालाच्या बलदेव नगर आणि एअर फोर्स बेस कॅम्प भागाच्या सीमेवर होते. विमानातून टाकण्यात आलेले सामान एका घराच्या छतावर पडले, तर काही सामान रस्त्यावर पडले. घटना घडल्यानंतर काही वेळात अॅम्बुलन्स आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. भारतीय वायु दलाचे वरिष्ठ अधिकारी देखील या परिसरात काही नुकसान झाले का? हे पाहण्यासाठी बाहेर पडले होते. 

याचवर्षी जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशच्या कुशीनगर भागात जॅग्वार विमान अपघातग्रस्त झाले होते. गोरखपूर येथून उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडली होती. या विमानाचे पायलट विंग कमांडर रोहित कटोच विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले होते. भारतीय वायू दलाच्या ताफ्यात जवळपास 100 जॅग्वार विमान दाखल आहेत. ही विमाने 1970 दशकाच्या उत्तरार्धात युरोपातून आयात करण्यात आली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident was avoided because of pilots safety and smart move