esakal | धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या युवकास गुजरातमधून अटक
sakal

बोलून बातमी शोधा

dhoni jeeva main.jpg

गुजरात पोलिसांनी संशयित आरोपीला रांची पोलिसांच्या हवाली केले आहे.

धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या युवकास गुजरातमधून अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची मुलगी झिवाला सोशल मीडियावर धमकी देणाऱ्यास गुजरातमधील कच्छ येथून अटक करण्यात आली आहे. मुंद्रा येथील नामना कपाया गावातून धमकी देणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे. पोलिसांनी धोनीच्या कुटुंबीयांच्या सहमतीने त्याच्या विरोधात रांची रातू ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुजरात पोलिसांनी संशयित आरोपीला रांची पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या झारखंड पोलिसांच्या तांत्रिक पथकाला गुजरातमधील आयपी अ‍ॅड्रेसवरुन आक्षेपार्ह शब्द वापरुन धमकी देणाऱ्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एका युवकाला अटक केली आहे. 

तत्पूर्वी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला सोशल मीडियावर मिळालेली धमकी आणि त्याची मुलगी झिवाबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे रविवारी रांची येथे त्याच्या चाहत्यांनी निदर्शने केली होती. आरोपीला त्वरीत अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. 

दुसरीकडे रांची पोलिसांच्या तांत्रिक पथकाकडून करण्यात आलेल्या प्रारंभीच्या चौकशीत धोनी आणि त्याच्या मुलीला धमकी देणारा व्यक्ती गुजरातमधील असल्याचे समोर आले होते. आयपीएलमधील धोनीच्या खराब कामगिरीमुळे चिडून ही पोस्ट केल्याचे सांगण्यात येते. 

हेही वाचा- काँग्रेसने खुशबू सुंदर यांना प्रवक्ते पदावरुन हटवले, भाजपत सहभागी होण्याची शक्यता

दरम्यान, झारखंडमधील रातू येथील सिमालिया स्थित फार्म हाऊसवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या फार्म हाऊसवर अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत.