राज्य सरकारकडून सूडबुद्धीने कारवाई : कोळसे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मार्क्‍सवादाची पुस्तके वाचणे आणि त्या विचारांचा आदर करण्याने कोणी नक्षलवादी होत नाही. जे लोक न्यायासाठी लढत आहेत त्यांना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. माओवादी षड्‌यंत्राच्या खोट्या कहाण्या रचल्या जात आहेत. सरकारविरोधातील आवाज दाबण्यासाठीच "शहरी नक्षलवाद' या नावाखाली सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. 

- प्रा. आनंद तेलतुंबडे

मुंबई : कोरेगाव भीमामधील दंगल ठरवून करण्यात आली होती आणि या दंगलीत हात असणाऱ्यांना राज्य सरकार पाठीशी घालत असून, मानवाधिकार कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी बुधवारी केला. तसेच देशभरात सध्या असलेली अघोषित आणीबाणी ही यापूर्वीच्या आणीबाणीपेक्षा भयानक असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. एल्गार परिषदेचा मी स्वत: आणि माजी न्यायाधीश पी. बी. सावंत असे संयोजक होतो. या परिषदेसाठी कुठल्याही नक्षलवाद्यांचा पैसा वापरला गेला नव्हता, असा दावा कोळसे-पाटील यांनी केला. 

पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेचा डाव्या चळवळीतील विविध नेते, विचारवंत आणि 37 सामाजिक संस्थांनी पत्रकार परिषद घेऊन यांच्या सुटकेची मागणी केली. ही कारवाई अन्यायकारक आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, या सर्वांवर ठेवण्यात आलेले खोटे आरोप मागे घेण्यात यावेत आणि सर्वांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. 

विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या कारवाईमागे फार मोठे कारस्थान आहे. सनातन संस्थेच्या साधकांकडून ईद आणि गणेशोत्सवात बॉंबस्फोट घडवण्याचा कट रचण्यात आला होता. हा कट उघड झाल्याने त्यावरील लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे. स्वामी अग्निवेश, उमर खालिद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर आज झालेली कारवाईही त्याच मालिकेचा भाग असल्याचे कोळसे-पाटील म्हणाले. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव भीमा दंगल घडवली, असा पोलिसांचा अहवाल आहे. मात्र अद्याप भिडेंना आणि त्यांच्या साथीदारांना अटक झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या दबावामुळे एकबोटेला अटक झाली. ज्यांनी प्रत्यक्षात दंगल घडवली त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. 
 

Web Title: Action by the State Government Kolase Patil