अखेर रजनीकांत यांची घोषणा, जानेवारीत करणार राजकीय पक्षाची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

चला आता सर्व बदलूयात, आता नाही तर कधीच नाही. त्यांनी पुढे म्हटले की, आगामी विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे.

चेन्नई- प्रख्यात अभिनेते रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्यावरुन दीर्घ काळापासून सुरु असलेला सस्पेन्स अखेर संपुष्टात आणला आहे. रजनीकांत यांनी जानेवारी 2021 मध्ये राजकीय पक्ष स्थापन करणार असून याबाबत 31 डिसेंबर रोजी घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी याबाबत एक टि्वट केले असून त्यात म्हटले की, चला आता सर्व बदलूयात, आता नाही तर कधीच नाही. त्यांनी पुढे म्हटले की, आगामी विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. आम्ही जनतेला एक पारदर्शी, भ्रष्टाचार मुक्त आणि कोणत्याही धार्मिक-जातीयवाद न करणारे सरकार देऊ. रजनीकांत हे पूर्वीपासून तामिळनाडूमधील जनतेला एक राजकीय पर्याय देण्याबाबत बोलत होते. आता त्यांनी त्या दिशेने आपले पाऊल उचलले आहे. 

यापूर्वी सोमवारी रजनीकांत यांनी आपली संघटना रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी लवकरच राजकीय इनिंग सुरु करणार असल्याचे म्हटले होते. त्यांनी जिल्हा सचिवांबरोबर ही बैठक घेतली होती. समर्थकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर रजनीकांत यांनी सचिवांबरोबर बैठक घेतली होती.

हेही वाचा- 'चार वर्षांनंतर मी पुन्हा येईन', डोनाल्ड ट्रम्प यांचा आता 2024 साठी दावा

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तमिळनाडूचा दौरा केल्यानंतर आगामी निवडणुकीसंदर्भात सर्व पक्षांची सक्रियता वाढली आहे. अशा परिस्थितीत रजनीकांत यांचा पक्ष मक्कल मद्रम निवडणुकीच्या रिंगणात उतरेल का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते. रजनीकांत यांच्या घोषणेमुळे यावर आता पडदा पडला आहे. 

हेही वाचा- अमेरिकेतून गायब झालेला रहस्यमयी खांब दिसला यूरोपात; लोकांमध्ये गोंधळ

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. असे असले तरी त्यांची अधिकृतपणे राजकारणात एँट्री झालेली नाही. मागीलवर्षी कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे उभय नेते एकत्र येण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच रजनीकांत भाजपचे कमळ हाती घेतील अशीही एक अटकळ बांधली जात होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor Rajinikanth A political party will be launched in January Announcement will be made on December 31st