'चार वर्षांनंतर मी पुन्हा येईन', डोनाल्ड ट्रम्प यांचा आता 2024 साठी दावा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

आपली चार वर्षे जबरदस्त होती. आम्ही आणखी चार वर्षांसाठी प्रयत्न करत आहोत. नाहीतर आपण पुन्हा चार वर्षांनी भेटूच

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ज्यो बायडन यांनी पराभव केला आहे. परंतु, ट्रम्प हे कधी आपला पराभव मान्य करतात तर कधी म्हणतात मीच विजयी झालो. सातत्याने आपली भूमिका बदलणारे ट्रम्प यांनी आता स्वतःला 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचा उमेदवार घोषित केले आहे. 'आपली चार वर्षे जबरदस्त होती. आम्ही आणखी चार वर्षांसाठी प्रयत्न करत आहोत. नाहीतर आपण पुन्हा चार वर्षांनी भेटूच', असे ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस येथे ख्रिसमससाठी आयोजित पार्टीत म्हटले.

या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे अनेक दिग्गज सहभागी झाले होते. या कार्यक्रमात माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ कार्यक्रमानंतर लगेच सार्वजनिक करण्यात आला. 

हेही वाचा- हरियाणातील भाजप सरकार संकटात ? शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन उपमुख्यमंत्री चौटाला देऊ शकतात राजीनामा

निवडणूक होऊन एक महिना झाल्यानंतरही 74 वर्षीय ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. बायडन यांच्यापेक्षा आपणच आघाडीवर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे बायडन यांनी मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्येच जास्त वावरत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर कमी झाला आहे. निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करताना ते चिथावणीखोर टि्वट करण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे ऍटर्नी जनरल यांनी निवडणूक अत्यंत सुरक्षित झाल्याचे म्हटले आहे. 

हेही वाचा- शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी द ग्रेट खली मैदानात; म्हणाला सरकारची गाठ आमच्याशी आहे

निवडणुकीचे निकाल प्रभावित करतील असा घोटाळा झाल्याची एकही गोष्ट आजपर्यंत आम्हाला दिसलेली नाही, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अमेरिकेचे ऍटर्नी जनरल बिल बार यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना दिली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will see you in another four years Donald Trump hints at 2024 presidential election