
'ट्विटर विकत घेतले नाहीत, तर..'; अदर पूनावालांचा इलॉन मस्कला सल्ला
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी नुकतीच मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर 44 अब्ज डॉलर्सना विकत घेतले आहे. सध्या या कराराला सध्या अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. पण जर काही कारणास्तव इलॉन मस्क ट्विटर सोबतची डील पूर्ण होऊ शकली नाही, तर अदर पूनावाला यांनी इलॉन मस्क यांना पुढील गुंतवणूकीसाठी एक सल्ला दिला आहे.
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी इलॉन मस्क यांना नवीन गुंतवणुकीबद्दल ट्विट करून सल्ला दिला आहे. पूनावाला यांनी लिहिले की, "इलॉन मस्क, ट्विटर विकत घेण्याचा तुमचा करार पूर्ण झाला नाही, तर त्यातील काही भांडवल मोठ्या प्रमाणात आणि उच्च दर्जाच्या टेस्ला कारच्या उत्पादनासाठी गुंतवण्याचा विचार करा." त्यांनी पुढे लिहिले, "मी तुम्हाला खात्री देतो की ही तुमची सर्वोत्तम गुंतवणूक असेल."
दरम्यान भारतात टेस्ला कार बनवण्यावरून सरकार आणि इलॉन मस्क यांच्यात चर्चा सुरू आहे, भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढत असून देखील भारतात अद्यापही टेस्ला कार लॉंच करण्यात आलेली नाहीये. इलॉन मस्क यांना भारतात टेस्लाचा कारखाना सुरू करण्याएवजी तयार केलेल्या कार भारतात आणण्यासाठी आयात करातून सूट हवी आहे. परंतु सरकारने वेगवेळी स्पष्ट केले आहे की, जर टेस्लाला भारतात कार विकायची असेल, तर त्याला येथे कारखाना उभारावा लागेल. तेव्हाच त्यांना सूट दिली जाईल.
या दरम्यान गेल्या महिन्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की जर टेस्ला भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यास तयार असेल तर काही हरकत नाही पण कंपनीने चीनमधून कार आयात करू नये.