
'टुकार लोकांना उध्दव ठाकरे...'; पेडणेकरांचे नवनीत राणांना प्रत्युत्तर
मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण प्रकारणानंतर चर्चेत आलेल्या खासदार नवनीत राणा यांना आज लिलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर लगेच नवणीत राणा यांनी पु्न्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना, तुम्ही कोणत्याही मतदारसंघातून लढा, मी तुमच्या विरोधात असेन हा माझा इशारा आहे असे आव्हान दिले. यानंतर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हाण दिलं आहे, त्यांनी "ठाकरे सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला आहे. माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, त्यांनी लोकांमध्ये येऊन निवडणूक लढवून आणि जिंकून दाखवावी. त्यांच्याविरोधात एक महिला उभी राहील. तुम्ही कोणत्याही मतदारसंघातून लढा, मी तुमच्या विरोधात असेन हा माझा इशारा आहे." असे त्या म्हणाल्या आहेत. राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. यावेळी न्यायालयाने काही अटीसुद्धा घातल्या होत्या.
दरम्यान या नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांना नवनीत राणांवर हल्लाबोल करत त्यांच्याकडून कोर्टाचा अवमान केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, कोर्टाने अटी शर्ती घातल्या आहेत, त्यांचा भंग होतोय, त्यांच्याकडून कोर्टाचा अवमान होतोय. पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, पुन्हा-पुन्हा शड्डू ठोकायचे, हे दाम्पत्य अपक्ष असूनही फारच आवाज करून बोलत होते, त्यानंतर त्यांना वाय सेक्युरिटी मिळाली त्यानंतर यांचा आत्मविश्वास खूपच वाढला, आता त्यामागचे चेहरे आपण सगळ्यांनी पाहिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
पेडणेकर म्हणाल्या की, मला लिलावती हॉस्पिटलला विचारायचं आहे की, रुग्णाचं चेकअप सुरू आहे, त्या एमआरआय मशीनपर्यंत कॅमेरा जाऊच कसा शकतो? असा प्रश्न लिलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या मॅनेजमेटला विचारणार आहोत असे पेडणेकर यांनी सांगीतलं. उध्दव ठाकरेंना दिलेल्या चॅलेंजवर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, ज्यांना स्वतःचा पक्ष नाही अशा टुकार लोकांना उध्दव ठाकरे उत्तर देणार नाहीत आम्ही आहोत, असे पेडणेकर म्हणाल्या.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या आव्हाणानंतर नवनीत राणा मुंबईत प्रचारासाठी उतरल्या तर शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यात संघर्ष पाहायला मिळेल का? यावर पेडणेकर म्हणाल्या की, मुळीच नाही, आमच्यासाठी ते टुकार आहेत, आम्ही कामाने मोठे होणार असे त्यांनी सांगीतलं. नवनीत राणा भाजपचा प्रचार करणार यावर, या तर खरं, बघूया, असं आव्हानच पेडणेकर यांनी दिलंय. त्यांनी आमच्यासाठी ते टुकार आहेत, आम्ही आमची कामे घेऊन लोकांपुढे जाणार आहोत. म्हैस पळवायची असेल, तर घंटा वेगळ्या दिशेने वाजवायची असा प्रकार होतो आम्ही म्हैस पळवूच देणार नाही, तुम्ही घंटा, भोंगे वाजवत बसा.. असे त्या म्हणाल्या.