केजरीवालांकडून केवळ जाहिरातबाजी - अमित शहा

Amit-Shah
Amit-Shah

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवून दिल्ली विधानसभा निवडणूक आपण स्वतःच्या हातात घेतल्याचे सूतोवाच केले. लाजपतनगर भागात ‘दिल्ली सायकल वॉक’ प्रकल्पाचे शहा यांच्या हस्ते उदघाटन झाले. या वेळी बोलताना अमित शहा यांनी केजरीवाल सरकारने कामे न करता स्वतःच्याच जाहिराती झळकावल्याचा आरोप केला. निवडणूक येताच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीसीए) काँग्रेस आणि ‘आप’ने युवकांची दिशाभूल केल्याने दंगल पेटली, असेही ते म्हणाले.

भाजप नेत्यांची अंतर्गत गटबाजी शहा यांच्याही लक्षात आल्याने त्यांनी दिल्लीची निवडणूक स्वतःच्या हाती घेतल्याचे स्पष्ट चित्र आहे. ‘‘काँग्रेस, राहुल व प्रियांका गांधी यांनी ‘सीसीए’वरून अल्पसंख्यांकांची दिशाभूल केली व दिल्लीतील दंगलींच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. ‘आप’नेही यात वादग्रस्त भूमिका बजावली. दिल्लीची जनता याचा हिशेब नक्की मागेल,’’ असे शहा कडाडले. शहा यांनी सांगितले की, केजरीवाल सरकारने पाच वर्षे काहीच काम केले नाही व अखेरच्या पाच महिन्यांत जाहिरातींचा मारा करून जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम केले. आधी केजरीवाल म्हणत की कोणतीही सरकारी सुविधा मी घेणार नाही. नंतर मात्र बंगला व गाडी घेऊन टाकली. दिल्लीत सर्वत्र वाय-फाय सुविधा देण्याची घोषणा त्यांनी केली; पण वाय-फायचे कनेक्‍शन शोधता शोधता तरुणांच्या मोबाईलमधील बॅटरी संपते तरी वाय-फाय मिळतच नाही.  ‘आप’च्या निवडणूक जाहीरनाम्यातील ८० टक्के घोषणा कागदावरच राहिल्या. २० महाविद्यालये व ५०० शाळा हे उघडणार होते, पण आता त्यासाठीही जाहिरातीच पहाव्या लागतील असे दिसते. केवळ राजकीय स्पर्धेमुळे तुम्ही मोदींच्या आयुष्मान भारत योजनेची दिल्लीत अंमलबजावणी केली नाही. केजरीवाल सरकारने गाव व गरीब यांचे सर्वाधिक नुकसान केले, याचाही हिशेब जनता मागणार आहे.

केजरीवाल यांनी पंधरा लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या जाहिराती केल्या, पण दिल्लीकर शोधून शोधून दमले तरी हे कॅमेरे नक्की कोठे बसविलेत, हे समजत नाही.
- अमित शहा, गृहमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com