रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधान मोदींनी उचलले पाऊल!

टीम ई-सकाळ
सोमवार, 6 जानेवारी 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, देशातील प्रमुख उद्योगपतींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

नवी दिल्ली : देशातील आर्थिक मंदीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील प्रमुख उद्योगपतींची भेट घेऊन, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आहे. यात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा,  बाबा कल्याणी, रिलायन्सचे मुकेश अंबानी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोजगारावर चर्चा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, देशातील प्रमुख उद्योगपतींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप मिळालेला नाही, मात्र, देशातील आर्थिक स्थिती आणि उद्योजकांच्या अडचणी यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. देशात प्रामुख्याने रोजगाराची मोठी समस्या भेडसावत आहेत. त्याविषयी चिंता व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी यांनी बैठकीला उपस्थित सर्व उद्योजकांशी चर्चा केल्याची माहिती आहे. देशाची आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधान मोदींनी चर्चेत भर दिल्याचे समजते. बैठकीला भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा समूहाचे रतन टाटा, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी, भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन उपस्थित होते.

आणखी वाचा - भविष्यात मनसे देणार भाजपला साथ?

उद्धव ठाकरेही भेटणार उद्योगपतींना?    
राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्यात येणार असून, त्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी मंगळवारी (दि. 7) मुंबईत संवाद साधणार आहेत.  मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री. ठाकरे पहिल्यांदाच मोठ्या उद्योगसमुहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे आयोजित या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, आदि गोदरेज, सज्जन जिंदाल, उदय कोटक, दीपक पारेख, गौतम सिंघानिया, बाबा कल्याणी आदी नामवंत उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. या संवादाच्या वेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे राज्याच्या विकासाबाबतची आपली भूमिका उद्योगपतींसमोर मांडतील, अशी माहिती मिळाली आहे. राज्याच्या आर्थिक विकासाला अधिक गती देण्यासाठी राज्यातील आर्थिक क्षेत्राची सद्यस्थिती आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भातील माहिती उद्योगपतींकडून जाणून घेतली जाईल. तसेच राज्याच्या विकासाचा आराखडा बनविताना त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील प्रमुखांच्या सूचनांचा योग्य विचार केला जाणार आहे, असे समजते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi meets prime businessmen in delhi discussed employment opportunities